सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे चित्रपट गीत म्हणजे संत बहिणाबाई चौधरी यांची मूळ रचना. चित्रपटगीतासाठी मूळ अहिराणी रचनेत शब्दबदल करून कडव्यांची संख्यादेखील कमी केली आहे. मात्र, मूळ गीत आपण वाचले, तर बहिणाबाईंनी या एका कवितेत सुखी संसाराचे सार जणू काही ओतले आहे आणि त्यांच्याही नकळत सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला आहे. तो कसा? ते पहा. अरे संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मियते भाकर। आपली रोजची धावपळ सुरू असते, ती दोन वेळची मीठ भाकरीची सोय सुटावी म्हणून! म्हणजेच, जगण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. याव्यतिरिक्त आपण खातो, त्याला चैन किंवा चोचले म्हणता येईल. पण आयुर्वेद म्हणा किंवा अलिकडचे मॉडर्न आहारशास्त्र म्हणा, पुन्हा आपल्याला आपल्या मूळ आहारशास्त्राकडे नेत भाकरी खा, तंदुरुस्त राहा, असा सल्ला देत आहे. आज सकाळीच, समाज माध्यमावर एक आहारतज्ज्ञ, स्वत: बनवलेल्या भाकरीचा आपल्या आहारात समावेश करा, अशी लोकांना सूचना देत होत्या. म्हणजे पुन्हा आल्या की नाही, बहिणाबाई...! भाकरीचे अगणित फायदे शरीराला मिळतात. भाकरीच्या पिठात अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे भाकरी खाण्याचा कंटाळा येतो, ही सबब चालणार नाही. डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी सांगितलेले पुढील फायदे वाचल्यावर तुम्ही भाकरी नाकारणार देखील नाही.