Chanakyaniti: तुमच्या घरात 'या' तीन पैकी एक जरी चूक होत असेल तरी लक्ष्मीकृपेस अपात्र ठराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 09:40 AM2024-08-12T09:40:28+5:302024-08-12T09:43:57+5:30

Chanakyaniti: मनुष्य प्राणी धड पडेपर्यंत धडपड करतो ते पैसे कमवण्यासाठी, स्थिर स्थावर होण्यासाठी, सुखी-निरोगी आयुष्य जगण्यासाठी! मात्र केवळ व्यवहारात चोख असून उपयोग नाही, समाजाच्या चौकटीत राहताना काही नीती-नियम पाळणेही बंधनकारक असते. त्या नियमांबद्दल सांगत आहेत आचार्य चाणक्य!

आचार्य चाणक्य यांना भारतातील मोठे विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्ता म्हटले जाते. मानवी जीवन सफल आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांनी काही जीवनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात सांगितले आहे, की जे लोक तीन प्रकारच्या चुका करतात त्यांच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही.

चाणक्यनीतीनुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या स्वयंपाक घरात उष्टी, खरकटी भांडी असतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी लोक अशी भांडी रात्रीच घासून ओटा लख्ख करून मगच झोपत असत. 'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपण ऐकलेली आहेच, त्यानुसार जिथे अशी खरकटी भांडी असतात, तिथे नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढते आणि माता लक्ष्मी पाऊल ठेवत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे तिन्ही सांजेला घरात झाडू मारल्यास माता लक्ष्मी रुष्ट होऊन घराच्या बाहेरून परस्पर निघून जाते. कारण घराचा उंबरठा हे माता लक्ष्मीचे प्रवेशाचे स्थान आहे आणि तिन्ही सांज ही तिच्या येण्याची वेळ आहे, त्यामुळे या कालावधीत घरी आलेल्या लक्ष्मीला केर दाखवून आपण तिचा रोष ओढवून घेऊ शकतो व त्यामुळे कायम स्वरूपी दारिद्र्याचा सामनाही करावा लागू शकतो.

तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांच्या घरी वयोवृद्ध माणसं, बाईमाणूस, गोरगरीब, नोकर-चाकरांचा अपमान केला जातो, त्यांना हीन वागणूक दिली जाते, अशा लोकांच्या घरीदेखील लक्ष्मी माता थांबणे पसंत करत नाही. त्या घरावर काय आर्थिक संकट राहते, मनुष्य कर्जबाजारी होतो आणि अशी वागणूक देणाऱ्या व्यक्तीचेही हाल होतात, तेव्हा तिचा सांभाळ करायला कोणीही उरत नाही.

लक्ष्मीचे उपासक म्हणून आपणही या तिन्ही गोष्टी आपल्या घरात घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तरच आचार्य चाणक्य यांच्या नियमांचे पालन होईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे आपल्या घरा दारावर तिचा वरदहस्त कायम राहून आपल्याला धनधान्याची उणीव कधीही भासणार नाही!