Chanakyaniti: 'या' लोकांच्या सहवासात राहाल तर तुमची प्रगती अशक्य; वाचा चाणक्यनीती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:33 PM2024-07-05T12:33:21+5:302024-07-05T12:36:39+5:30

Chanakyaniti: चाणक्य ज्याला 'कौटिल्य' म्हणूनही ओळखले जाते. देशातील महान विद्वानांमध्ये त्यांची गणना होते. चाणक्य हे शिक्षक आणि महान सल्लागार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती या नावाने एक महान ग्रंथ रचला आहे. मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा या नितीशास्त्रात उल्लेख केला आहे, ज्याचा अभ्यास केल्यास योग्य मार्गदर्शन मिळते.

चाणक्याच्या या धोरणात यशाची अनेक सूत्रे आहेत, ज्याचा अवलंब केल्यावर प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. याशिवाय त्यात अशा लोकांचाही उल्लेख आहे ज्यांच्यापासून नेहमी सावध राहावे. चाणक्यनीतीनुसार व्यक्तीने पुढील तीन प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे. हे लोक तुमच्या प्रगतीत नेहमीच अडथळे बनतात. आणि त्यांच्या सहवासात राहून तुमचीही प्रगती थांबते.

चाणक्य नीतीनुसार, अनैतिक मार्गाने काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे. असे लोक स्वतः चुकीची वाट धरतात आणि दुसऱ्यालाही चुकीच्या मार्गावर नेतात. त्यामुळे तुम्ही आपोआप यशापासून, सन्मार्गापासून दूर जाता. अशा लोकांपासून चार हात लांब राहणे केव्हाही चांगले. असे लोक स्वतःचे भले करत नाहीत आणि दुसऱ्याचे भले होऊ देत नाहीत.

जीवनात यश मिळवण्यासाठी प्रथम अपयशाच्या मार्गाने जावे लागते. अपयश प्रत्येकाला येते. पण त्यामुळे खचून न जाता उभारी घ्यायला हवी. त्यासाठी मित्रसुद्धा सकारात्मकता देणारे असावेत. अन्यथा काही लोक अपयशाने खचलेल्या लोकांना आणखीनच नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, रिकाम्या लोकांपासून दूर राहायला हवे. हे लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि जे काही करू इच्छितात त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचे काम करतात. असे लोक मानसिक तणाव निर्माण करायला कारणीभूत ठरतात. त्यांच्याशी मैत्री न ठेवलेली बरी!

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक स्वार्थासाठी गोड बोलून आपले काम करवून घेतात अशा लोकांपासून दूर राहा. कारण हे लोक त्यांचे काम झाल्यावर तुमच्याकडे ढुंकून पाहतही नाहीत. तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीवसुद्धा ठेवत नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते तुमचे नुकसान करू शकतात.

जे लोक झालेल्या चुकांमधून किंवा दुसऱ्यांच्या चुकांमधून सावध होतात त्यांना शहाणे म्हणावे, मात्र जे लोक पुनः पुन्हा त्याच त्या चुका करतात, शिकत नाहीत आणि नशीब साथ देत नाही म्हणत रडत बसतात, अशा विवेकशून्य लोकांपासून दूर राहावे. ते स्वतः मूर्ख बनतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही मूर्ख बनवतात.