Chanakyaniti : तीन प्रकारच्या लोकांना स्वतःपासून कायम दूर ठेवा, सांगताहेत आचार्य चाणक्य! By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:37 AM 2023-10-12T11:37:11+5:30 2023-10-12T11:41:01+5:30
Chanakyaniti: पैसे हे वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जमवण्यासाठी असतात; मात्र सद्यस्थितीत लोक पैसे जमवू लागले आहेत आणि माणसांना वापरू लागले आहेत. कोणीतरी आपला त्यांच्या गरजेपुरता वापर करतंय ही भावना अतिशय क्लेशदायी असते. नंतर होणारा त्रास, पश्चात्ताप टाळण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी दिलेले उपाय करा! आचार्य चाणक्य म्हणतात, भोळ्या स्वभावाची माणसं लवकर फसतात. कोणीही त्यांचा वापर सहज करू शकतात. यात त्यांचे नुकसान झाले तरी त्यांना कळत नाही. अशा लोकांच्या वाट्याला कायम निराशा येते. मात्र ही निराशा, फसवणूक त्यांनी आपणहून ओढवून घेतलेली असते.
अशा लोकांनी स्वार्थी लोकांपासून सावध राहण्यासाठी आणि त्यांची पारख करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी तीन स्वभाव वैशिष्ट्य सांगितली आहेत. यावरून समोरील व्यक्ती आपल्याला वापरून घेतेय की खरंच अडचणीत आहे ते आपल्या लक्षात येईल. त्या स्वभाव वैशिष्टयांबद्द्दल जाणून घेऊ.
गोड बोलणारे लोक : नेहमी गोड बोलणारे, सर्वांशी हसत मुखाने वागणारे, आपल्याबरोबर समोरच्यांचेही ऐकून घेणारे लोक स्वभावात: चांगले असतात. मात्र जे लोक गरजेच्या वेळी गोड बोलतात, इतर वेळी दुर्लक्ष करतात, आपल्या मताला किंमत देत नाहीत मात्र कामाच्या वेळी लांगूलचालन करतात अशा लोकांपासून दूर राहा. ते तुमचा वापर करत आहेत हे जाणून घ्या.
सतत दोष देणारे लोक : काही लोकांना स्वतःची जबाबदारी झटकण्याची सवय असते. एवढेच नाही, तर ते स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडून मोकळे होतात. असे लोक स्वतःचा कातडी बचाव करण्यासाठी तुमच्यावर फसवणुकीचा आळ घ्यायलाही कमी करणार नाहीत. अशा लोकांपासून चार हात दूर राहा.
सतत डाफरणारे लोक : हुकूमशाही काही लोकांच्या अंगातच असते. असे लोक दुसऱ्याचं ऐकून घेत नाहीत आणि आपलं तेच खरं करतात आणि समोरच्याला आपल्याला हवं तस वागवतात. अशा लोकांच्या हाताखाली गुलामी करण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहून स्वाभिमानाने जगणं केव्हाही चांगलं! नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनेकदा असे लोक आपल्याला भेटतात, पैशांसाठी आपल्याला त्यांच्यासमोर झुकते मापही घ्यावे लागते. मात्र तिथेही किती मर्यादेपर्यंत झुकायचे हे स्वतःशी ठरवून घ्या. काम प्रामाणिकपणे आणि कौशल्याने करत असाल तर दुसरीकडे तुम्हाला तुमच्या कामाचा चांगला मोबदला मिळू शकतो याची खात्री बाळगा.