ChanakyaNiti: संकट काही क्षणांचे, मात्र उपकार आयुष्यभराचे; आचार्य चाणक्य यांच्या ३ गोष्टी लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:56 PM2022-12-26T15:56:12+5:302022-12-26T15:59:09+5:30

Chanakyaniti : संकटात धीर गमावलेली व्यक्ती वेडीपिशी होते आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी वाटेल ती जोखीम पत्करायला तयार होते. मात्र अशा लोकांसाठी आचार्य चाणक्य सांगतात, संकट काही क्षणांचे, मात्र उपकार आयुष्यभराचे राहतात हे कायम लक्षात ठेवा आणि संकटकाळात कितीही त्रास झाला तरी पुढील तीन वृत्तीच्या लोकांकडून कदापि मदत घेऊ नका.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये मनुष्याला आयुष्याची जडण घडण होण्यास पूरक ठरतील असे आदर्शवादी आणि वास्तविक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार आपल्याला विचार करायला लावून त्यानुसार कृती करायला भाग पाडतात. या लेखातही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे.

'सुख के सब साथी, दुख मे न कोई' हे एक वाक्य आयुष्याचं मर्म सांगणारे आहे. आपल्या सुखाच्या अर्थात उत्कर्षाच्या काळात लोकांना बोलवावे लागत नाही तर ते आपणहून येतात. याउलट दुःखाच्या, संकटाच्या वेळी लोकांकडे मदत मागायला जाल, तर ते पाठ फिरवून घेतात. यासाठीच आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असत की मदत विचारपूर्वक मागायला हवी.

संकटकाळी जो आपल्या मदतीला येतो तो खरा मित्र, अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. परंतु काही जण आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आवळा देऊन कोहळा काढतात. अर्थात मदत थोडीशी करतात पण त्याचा चौपट मोबदला या ना त्या स्वरूपात वसूल करतात. यासाठी आचार्य चाणक्य तीन प्रकारच्या लोकांकडून प्रकर्षाने मदत टाळा असा सल्ला देतात.

चाणक्य नीती सांगते स्वार्थी लोकांनी फुकट मदत केली तरी घेऊ नका. ते तुमचे भले कधीच करणार नाहीत. उलट तुम्ही जास्तीत जास्त संकटात कसे अडकाल यासाठी ते प्रयत्न करतील. अशा लोकांनी मदत करण्याचा आव आणला तरी त्याला भुलू नका. त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून सावध पवित्रा घ्या आणि त्यांच्याकडून मदत स्वीकारू नका.

जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमचा मत्सर करतात. तुम्हाला कमी लेखतात, अशा लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीला भुलू नका. तुमच्या दुःखाचे त्यांच्यासमोर प्रदर्शन करू नका. कारण असे लोक तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या दुःखाने त्यांनाच जास्त आनंद होईल हे लक्षात ठेवा. म्हणून आपले दुःख, आपल्या समस्या लोकांना सांगत फिरू नका!

ज्या व्यक्तीचे स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा व्यक्तीकडून कधीही मदत मागू नका. कारण अशी व्यक्ती आनंदाच्या भरात मदत करत असली तरी कधी तिचा मूड बदलेल आणि कधी ती रागाच्या भरात तुमच्याकडून केलेल्या उपकाराची वसुली करेल याचा नेम नाही. अशा व्यक्तींशी फार सलगी नको आणि दुष्मनीपण नको. त्यांचे उपकार तर नकोच नको!