Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:12 PM2024-09-23T13:12:11+5:302024-09-23T13:16:04+5:30

Chanakyaniti: व्यक्तिमत्त्व केवळ आकर्षक असून उपयोग नाही, लोकांना तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्कंठाही लागून राहिली पाहिजे. जसे की प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा! या वयातही ते पूर्वीसारखेच आकर्षक आणि आदरणीय वाटतात. असे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर काही गुण अंगिकारायला हवेत. एखाद्या मिटिंगमध्ये, समारंभात तुमची उणीव जाणवली पाहिजे, तुम्हाला आवर्जून बोलावले गेले पाहिजे, यासाठी तुमचे व्यक्तिमत्त्व थोडे रहस्यमय असणे गरजेचे आहे. बरेचदा आपल्या अघळ पघळ स्वभावामुळे कोणीही येतो आणि आपली टर उडवून जातो, हे चित्र बदलायचे असेल तर दिलेले नियम फॉलो करा.

आचार्य चाणक्य केवळ अर्थतज्ञ नव्हते तर त्यांनी मानवी जीवनमूल्यांचा बारकाईने अभ्यास केला होता. समाजाचे अवलोकन करून त्यांनी काढलेला निष्कर्ष ग्रंथ किंवा अनुभवाचे कथन म्हणजे चाणक्यनीती. यात दैनंदिन जीवनासाठी आवश्यक अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. पैकी व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित काही गोष्टी आज आपण जाणून घेऊ.

मनमोकळं हास्य मोहक वाटतं, पण दर वेळी नाही. मित्र परिवारात किंवा नातेवाइकांसमोर अनौपचारिकता चालून जाईल, पण नोकरी, व्यवसाय, व्यवहाराच्या बाबतीत मोजकेपणा हवा. अगदी हसण्याबाबतसुद्धा! मोनालिसाचे हास्य जगप्रसिद्ध आहे, नीट पाहिले तर लक्षात येईल ते गूढ हास्य आहे. आचार्य चाणक्य सांगतात, स्मित करायला शिका. समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनात काय सुरु आहे हे तुमच्या हसण्यावरून, देहबोलीवरून लगेच लक्षात येते, म्हणून मोजकं पण मोहक हसायला शिका.

'गरजेल तो बरसेल का?' असा आपल्याकडे वाक्प्रचार आहे. अर्थात जो नुसत्या बाता मारतो, तो प्रत्यक्षात कृती करतोच असे नाही. म्हणून आपल्या कामाची आखणी करा, कृती करा, यश मिळवा, मग गाजावाजा आपोआप होईल. याउलट तुम्ही आधीच सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसलात, तर गुप्तता राहणार नाही, त्याचा गैरफायदा दुसरे घेतील आणि तुमचे प्लॅन यशस्वी झाले नाहीत तर तुम्हाला नावेही ठेवतील.

चारचौघात बसल्यावर अवांतर गप्पा, वायफळ चर्चा किंवा निष्कर्षहीन विषय निघाले तर त्यात सहभागी होण्यापेक्षा पुस्तक वाचत बसा. इतरांच्या माना मोबाईलमध्ये शिरलेल्या असताना तुमची मान पुस्तकात डोकावत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर नक्की पडेल. लोक तुम्हाला अदबीने वागवतील, अनुभव घेऊन पहा.

दुसऱ्यांच्या मदतीला, हाकेला धावून जाणे ही माणुसकीची शिकवण आहे, तरीदेखील सध्याचा काळ पाहता कोणी मागितल्याशिवाय मदतीला धावू नका. कोणीही कुठल्याही कामाला बोलावले की आपल्या हातातले काम सोडून जाऊ नका. त्यामुळे तुमची किंमत कमी होते आणि तुमच्याकडे करण्यासारखे विशेष काम नाही असा चुकीचा संदेश लोकांकडे जातो. कधी कधी आणि योग्य ठिकाणी मोहाला बळी न पडता नकार देऊनही तुम्ही तुमची किंमत वाढवू शकता.

समर्थ रामदास स्वामींनीदेखील 'मूर्खांची लक्षणे' या समासात स्वस्तुती टाळा हाच सल्ला दिला आहे. स्वतःचे कौतुक करणारे लोक इतरांना आवडत नाही. लोक नाईलाजाने तुमचे ऐकून घेतील किंवा ऐकल्यासारखे करतील पण तुमच्या पश्चात तुम्हाला नावे ठेवतील. त्यामुळे दुसऱ्यांनी तुमचे कौतुक करावे असे वर्तन ठेवा, मात्र स्वतःच स्वतःचे कौतुक टाळा.