Chaturmas 2024: चातुर्मासातल्या गुरुवारी 'हे' ज्योतिष शास्त्रीय उपाय केले असता बिघडणार नाही घरचे 'बजेट!'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:17 PM2024-07-23T13:17:59+5:302024-07-23T13:20:31+5:30

Chatumas Astro Tips: सध्या चातुर्मास सुरु आहे. त्यानिमित्त दान धर्म करून पुण्य कमावण्यासाठी मुळात गाठीशी पैसा हवा. असलेला पैसा टिकवता यायला हवा आणि टिकलेला पैसे वाढवता यायला हवा. यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय नक्कीच लाभदायी ठरतील आणि आयुष्य आनंदात आणि आर्थिक अडचणींशिवाय जाईल असे ज्योतिष शास्त्राचे म्हणणे आहे.

उपाय साधा सोपा असल्याने आपणही तो अवश्य करून बघा. यासाठी आपल्याला दत्त गुरु, भगवान विष्णू तसेच गुरु बृहस्पती यांची पूजा करायची आहे. ती कशी करायची आणि त्यामुळे लाभ कसा होतो तेही पाहू.

गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा. यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. ती पुरचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवा. असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच आणखी एक पुरचुंडी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन अवैध मार्गाने येणार नाही.

गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी स्नान व पूजा करावी. यानंतर भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशीमंजरी अर्पण कराव्यात. त्याचीच पाने आणि अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे आणि घरच्या मंडळींनाही द्यावे. विष्णूपूजेचे पाणी एखाद्या फुलाने घरात चारही बाजूंना शिंपडावे. त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते.

गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भगवान विष्णूला केळीही अर्पण केली जातात. गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा. तसेच विष्णूंच्या पूजेचा तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा. असे केल्याने साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.

असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने कुंडलीत बृहस्पतिचे अर्थात गुरू स्थान मजबूत होते, गुरूबल वाढते, त्यामुळे साधकाचे वैवाहिक संबंध दृढ होतात. यासोबतच गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते.