Chaturmas 2024: चार महिन्यात ट्रान्फर्मेशन हवंय? चातुर्मासात फॉलो करा 'हे' डाएट आणि पहा स्वतःचा मेकओव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:54 AM2024-07-11T11:54:05+5:302024-07-11T11:58:27+5:30

Health Diet Tips: आषाढी एकादशीपासून अर्थात १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, वांगी, उंबराची फळे, आवळे, मसूर, महाळुंग, चिंचा इ. पदार्थाचा समावेश आहे. यादीचे नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल, की यातले बरेचसे पदार्थ वातूळ आणि आंबट आहेत, जे पावसाळ्यात आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. यासाठीच चातुर्मासात भोजनासंबंधीचे नियम पाळून पुढीलप्रमाणे एखादे व्रत करता येते. या नियमांचे पालन केले असता व्रत होते आणि डाएटही! त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

पानावर जेवणे. चातुर्मासात सणासुदींची रेलचेल असते. अशा वेळेस आपण नैवेद्यासाठीसुद्धा केळीचे पान घेतो. चातुर्मासात पर्णभोजनाचा संकल्प सहज शक्य आहे. कारण या काळात बाजारात किंवा आसपासच्या परिसरात मुबलक प्रमाणात केळीची पाने उपलब्ध असतात. त्यामुळे व्रत पूर्ण करण्यात बाधा येत नाही.

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते म्हणून आहारनियंत्रणाच्या दृष्टीने एकभोजन अर्थात एकभुक्त राहण्याचा पर्याय सांगितला आहे. सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ निश्चित करून दिवसभरातून एकदा भोजन करता येते. त्यामुळे आहारावर नियंत्रण राहते, पावसाळ्यात तब्येत चांगली राहते आणि मनावर व जिभेवर संयम वाढतो.

एका वेळेस वाढून घेणे. हे वाचून आपल्याला लग्न सराईत बुफे पद्धतीत एकाच वेळेस वाढून घेतलेली ताटे डोळ्यापुढे आली असतील. परंतु, व्रत म्हटल्यावर त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. एकाच वेळी वाढून घेणे, म्हणजे पुन्हा पुन्हा खावेसे वाटण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे. ताटात जेवढे वाढले आहे, तेवढेच जेवून उठणे. असे केल्यामुळे आरोग्य नियंत्रणात राहते. हा उपाय जरूर करून पहा.

सर्व पदार्थ वाढून एकत्र कालवून खाणे. हा प्रकार क्वचितच कोणी करत असेल. आपण भारतीय चवीने जेवणारे लोक. त्यामुळे अशा प्रकारचे व्रत म्हणजे शिक्षाच म्हटली पाहिजे. परंतु, ज्याअर्थी हे व्रत सांगितले आहे, त्याअर्थी त्यामागे प्रयोजन असावे. ते असे, की जेवताना आपण आवडी निवडीला प्राधान्य देऊन नावडत्या पदार्थाला नाक मुरडतो. अन्नाचा अपमान करण्याची सवय मोडावी, म्हणून गोपाळकृष्णाने केला तसा गोपाळकाला अर्थात मिश्रभोजनाचा पर्याय दिला असावा.

एखादा आवडता किंवा नेहमीच्या जेवणातला पदार्थ चार महिने सोडून देणे. अशा प्रकारचा संकल्प म्हणजे आजच्या काळातले डाएटच! एखादी गोष्ट सोड म्हटली की आपल्याला त्याबद्दल आणखीनच ओढ लागते. ही ओढ कमी होऊन ती गोष्ट, पदार्थ देवापायी अर्पण केला आहे, ही भावना अलिप्तपणा निर्माण करण्यास मदत करते.

दूध-भात खाणे. बालपणानंतर क्वचितच कधी दूध भात खाण्याचा प्रसंग आपल्यावर आला असेल. परंतु हे व्रत आहे, म्हणून त्यात कठीण पर्याय दिले आहेत. दूध भात यासाठी, की अन्नाचा वापर केवळ शरीराला ऊर्जानिर्मितीकरीता व्हावा. बाकी जिभेचे चोचले न संपणारे आहेत.