जानेवारीत जुळून आले आहेत धनयोग आणि राजयोग; ते कोणत्या राशींच्या नशिबात बदल घडवणार ते पाहू! By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:33 PM 2022-01-03T12:33:42+5:30 2022-01-03T12:42:27+5:30
नवीन वर्षात पदार्पण करून २ दिवस उलटले सुद्धा! तरी हातात ३६३ नवीन संधी हात जोडून उभ्या आहेत. गेलेल्या दिवसाचे दुःखं न बाळगता आगामी काळात जो कष्टाने यशाची मोहोर उमटवेल त्याची या वर्षात नक्कीच भरभराट होईल. अर्थात प्रयत्नांना नशिबाची साथ असेल तर दुधात साखरच! चला तर जाणून घेऊया वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी महिन्यात कोणत्या राशींसाठी ग्रहस्थिती अधिक अनुकूल आहे ते! जानेवारी महिन्यात रवी, बुध आणि शनी हे ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहेत, तर धनु राशीत मंगळ, कुंभ राशीत गुरु आणि राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ही सर्व ग्रहस्थिती धनयोग आणि राजयोग निर्माण करणारी आहे. तिला बुधादित्य स्थिती असेही म्हणतात. या महिन्यात अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी हे योग देखील आहेत. या सर्वाचा अनुकूल परिणाम पुढील राशींवर बघायला मिळेल.
मेष : मेष राशीसाठी हा महिना उत्तम ग्रहस्थिती देणारा आहे. कल्पक किंवा सृजनशील कार्यात लोकांना भरघोस यश मिळू शकते. त्याचा प्रभात आर्थिक स्थितीवर पडून भरभराट होऊ शकते. घरात मंगल कार्याचे देखील योग आहेत.
मिथुन : नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक आयुष्यासाठी हा काळ अतिशय सुखद ठरणारा असेल. वारसा हक्काने धन धान्य मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे आपली पद प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे.
सिंह : या राशीसाठी हा महिना अतिशय लाभदायक आहे. ज्या क्षेत्रात रस घ्याल तिथे यश मिळू शकेल. फक्त स्वभावावर नियंत्रण ठेवा म्हणजे कार्यसिद्धी होईल. आयुष्याला नवे वळण मिळण्यासाठी हा काळ अनुकल आहे.
कन्या : या महिन्यात नोकरी, व्यवसायात पदोन्नती होईल, वाढ होईल. मोठी संधी चालून येईल. त्या संधीचे सोने करा. आर्थिक वृद्धी होण्यासाठी त्या संधीचा निश्चित हातभार लागणार आहे.
वृश्चिक : धन, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्तीचे मार्ग खुले होतील. विकासाच्या नवीन वाटा सापडतील. लोकप्रियता वाढेल. कौटुंबिक स्थिती सुधारेल तसेच आर्थिक भरभराट होईल.
मकर : या महिन्यात नशीब तुमच्या बरोबर असेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. व्यापारात प्रगती तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही शुभ वार्ता समजतील.