Diwali 2021: दीपोत्सव: लक्ष्मी देवीच्या आगमनाची लगबग; ‘अशी’ करा तयारी, नेमके काय टाळावे? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:25 PM2021-11-01T12:25:38+5:302021-11-01T12:30:37+5:30

Diwali 2021: वास्तुशास्त्राचे काही उपाय करून लक्ष्मी देवीच्या आगमनाची तयारी केल्यास सुख, समृद्धी, धन, धान्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यांमधील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दीपोत्सव साजरा केला जातो. (Diwali 2021)

आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजेच साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळत असून, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार अगदी फुलून गेल्याचे दिसले. (vastu shastra tips for preparation of lakshmi pujan)

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक महत्त्व आहे. शरद पौर्णिमेला आगमन झालेल्या लक्ष्मी देवीचे अश्विन अमावास्येला प्रदोषकाळी पूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. (vastu shastra tips for diwali preparation)

दिवाळीचा उत्सव हा सुख, समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. दिवाळीला संपूर्ण घराची साफ-सफाई, स्वच्छता केली जाते. अनेक घरांमध्ये रंगकाम केले जाते. केवळ घरात नाही, तर बहुतांश कार्यालये, दुकाने, कारखान्याच्या वास्तुलाही रंगकाम केले जाते. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

वास्तुशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीच्या आगमनाची तयारी केल्यास सुख, समृद्धी, धन, धान्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. भारतीय संस्कृतीतील धार्मिक मान्यतांनुसार, आंब्याच्या झाडाला दैवीय वृक्ष मानले गेले आहे. आंब्याच्या झाडाच्या समिधा विशेष करून पूजा, होम-हवनात वापरल्या जातात. धार्मिक कार्याची सुरुवात करतानाही आंब्याची डहाळी वापरली जाते.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. असे करणे धार्मिक दृष्ट्या शुभ मानले जाते. याशिवाय घरात सकारात्मकता येण्यास मदत होते. नकारात्मकता दूर होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी आगमनाची तयारी करताना अशा प्रकारचे तोरण अवश्य लावावे, असे सांगितले जात आहे.

घराच्या प्रवेशद्वाराजवळ एखादी जड वस्तू असता कामा नये. धन, समृद्धीच्या दृष्टिने अशा जड वस्तू मुख्य प्रवेशद्वाराजवळ असणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. घरातील प्रवेशद्वाराजवळ दगड, वीट किंवा अशा प्रकारचे जड सामान किंवा वस्तू असल्यास ती तातडीने तेथून दूर करावी, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, जड वस्तू प्रवेशद्वाराजवळ असल्यास धनागमनात समस्या उद्भवू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मी पूजनावेळी प्रवेशद्वार स्वच्छ, टापटीप असावे, असे म्हटले जाते. सकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या सर्वांसाठी आवश्यक असलेला घटक आहे.

सकारात्मकतेमुळे माणूस स्वस्थ, सुखी आणि संपन्न राहू शकतो, असे मानले जाते. वास्तुशास्त्रात यासंदर्भात काही उपाय सांगितले आहेत. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे, असे सांगितले जाते. लक्ष्मी पूजनावेळी असे केल्याने घरात सकारात्मकता, उत्साह, चैतन्य स्थिर राहण्यास मदत मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.

भारतीय संस्कृतीत स्वस्तिक चिन्हाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना जसे गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते, तसेच स्वस्तिकही काढले जाते. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते.

स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते. देशातील बहुतांश ठिकाणी धनत्रयोदशीपासूनच विविध व्रते, पूजन यांना सुरुवात होते. दिवाळीतील सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.

वास्तुशास्त्रात कोणत्याही देवतेचे पूजन करताना त्याची योग्य दिशा कोणती असावी, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांची स्थापना केली जाते. लक्ष्मी देवी आणि कुबेराची मूर्ती किंवा तसबीर उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.