Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी 'या' प्राण्यांचे दर्शन घडणे लाभदायक समजले जाते; ते प्राणी कोणते ते जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:55 PM 2022-10-14T15:55:10+5:30 2022-10-14T15:58:13+5:30
Diwali 2022: आपल्या रोजच्या जीवनात असंख्य कीटक, प्राणी, पक्षी यांचे आपल्याला दर्शन घडते. रोजच्या पाहण्यातल्या प्राण्यांकडे आपण शुभचिन्ह म्हणून पाहत नाही. तरी काही लोकसमजुतीनुसार कावळ्याची काव काव पाहुणे येण्याचे संकेत देते, भारद्वाज पक्षी दिसणे शुभ मानले जाते, मुंगूस दिसणे भाग्याचे लक्षण मानले जाते, घरात काळ्या मुंग्यांची रांग लागली की शुभ कार्य घडणार असे मानले जाते. अशा अनेक समजुतींप्रमाणे दिवाळी संदर्भात पुढील प्राण्यांचे दिसणे लाभदायक मानले जाते. आता हे खरे आहे की खोटे, याचा तुम्हीच अनुभव घ्या! गोमातेचे दर्शन पुण्यकारक मानले जाते. वाटेने जाताना गाय दिसली तरी आपण पटकन तिला नमस्कार करून मगच पुढे जातो वसुबारस हा सण तर गाय आणि वासराचा! वसुबारसेला पांढरी शुभ्र गाय दिसणे हे भाग्याचे लक्षण आहे. पांढरा शुभ्र रंग हा वैभवाचा, समृद्धीचा आणि शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या गोमातेच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी मिळण्याची संधी भविष्यात प्राप्त होऊ शकते.
घुबडाचे दर्शन घडणे तसे दुर्मिळच! घुबडाच्या दिसण्याबद्दल, आवाजाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. परंतु लक्ष्मी मातेने त्याला वाहन म्हणून स्वीकारले असल्याने त्याचे दर्शन लक्ष्मीच्या आगमनाची वर्दी देते. म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी तुम्हला घुबड दिसले तर लक्ष्मी तुमच्या घरी येण्याच्या तयारीत आहे असे समजा.
पाल पाहिली तरी अनेकांना शिसारी येते. कोणी तिला काठीने हाकलतात तर कोणी थेट लाठीमार करतात. तिच्या करड्या रंगामुळे ती डोळ्यांना सोसवत नाही. परंतु ईश्वराने प्रत्येक जीवाची निर्मिती काही ना काही कारणाने केली आहे. त्यामुळे सृष्टिचक्रातील त्यांची भूमिका ओळखून त्यांना तात्पुरते बाहेर काढा, पण शक्यतो मारण्याचे पातक करू नका. कारण लोकसमजूतीनुसार दिवाळीत पालीचे दिसणेही शुभ मानले जाते.
घरातील पाळीव मांजर वगळता परिसरातील एखादी मांजर तुमच्या घराजवळ गस्त घालत असेल, तर हे देखील समृद्धीचे लक्षण मानले जाते. रस्त्याने जाता येता आपल्याला मांजरी दिसतात, परंतु त्या आपल्या आड जाऊ नये म्हणून आपण पावलांची गती वाढवत ती आडवी जाण्याआधी आपणच तिला आडवे जातो. त्यामुळे आपले काम झाले असले तरी बिचारीचे काम अडले असेल, कोणी सांगावे? म्हणून तिला अशुभ न ठरवता, हाकलून न देता तिला वाटीभर दूध पिऊ घाला. तुम्हाला दूध दुभत्याची कमतरता राहणार नाही.
कुत्रा दिसला की भीतीने आपण पळ काढतो. वास्तविक पाहता त्यांच्या वाट्याला आपण गेलो नाही तर तेही आपल्या वाट्याला जात नाही. परंतु अकारण भीती मनात बसल्यामुळे आपण अनेक प्राण्यांबद्दल नकारात्मक भावना करून ठेवली आहे. दत्त गुरूंच्या पायाशी असलेली चार कुत्री चार वेद मानली जातात. माणसापेक्षा प्रामाणिक आणि एकनिष्ठ असणाऱ्या या प्राण्यावर उगीच हात न उगारता लक्ष्मी पूजेच्या रात्री भाकरी, पोळी, बिस्किटं खाऊ घाला. आपल्या संस्कृतीने प्रत्येक जीवाचा सन्मान करा असेच सांगितले आहे. त्यामुळे आपण भूतदया केली, तरच ईश्वरदयेस आपण पात्र ठरू शकू...!