Dussehra 2022 : दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार दिलेले उपाय करा आणि 'विशेष' लाभ मिळवा! By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:31 PM 2022-10-03T12:31:00+5:30 2022-10-03T15:11:11+5:30
Dussehra 2022 : विजयादशमीचा सण वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवण्याचा सण आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी आपणही श्रीरामाचे तसेच देवीचे पूजन करतो. काळ बदलला पण समाजातला आणि मनामनातला रावण अद्याप पूर्ण मेलेला नाही. त्या दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय संबंधित राशींच्या व्यक्तींनी अनुसरले तर त्यांना निश्चित लाभ होईल. मेष : मेष राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी 'श्रीराम जय राम जय जय राम'' या त्रयोदक्षरी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच आपट्याचे पान सर्वात पहिले राम मंदिरात रामचरणी वहावे मग इतरांना सोने द्यावे.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी. कारण रावणाशी लढण्यापूर्वी श्री रामानेही शिवाची पूजा केली होती. तसे केले असता तुम्हालाही हितशत्रूंवर मात करण्याचे बळ मिळेल.
मिथुन : दसऱ्याच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी महिषासुरमर्दिनीच्या दिव्य रूपाची पूजा करून महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण करावे. तसे केले असता देवीच्या कृपेने अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गा मातेच्या किंवा काली मातेच्या देवळात जाऊन दर्शन घेतले पाहिजे. देवीचे उग्र रूप तुमच्या आतील सुप्त चैतन्य जागृत करेल आणि नवीन कामांना.
सिंह : दसऱ्याच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी सिंहारूढ महिषासुर मर्दिनीचे स्तोत्र म्हणावे. तसेच गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. हातून कळत नकळत घडलेल्या पापातून मुक्तता व्हावी अशी प्रार्थना करावी.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून रामरक्षा म्हणावी.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शक्य तेवढा दान धर्म करावा. श्रीराम मंदिरात जाऊन राम पंचायतनाचे दर्शन घ्यावे. तसे केले असता दिवस शुभ जाईल, एवढेच नाही तर आगामी वर्षही सुख समाधानात जाईल.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी देवीचे दर्शन जरूर घ्यावे. देवीचे स्तोत्र पठण करावे आणि पाठ नसल्यास इंटरनेटच्या आधारे श्रवण करावे. याबरोबरच अन्नदान करणे लाभदायक ठरेल.
धनु : धनु राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी देवीच्या दर्शनाने सकाळची सुरुवात आणि सायंकाळी राम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घ्यावे. तुमचे कोणाशी वैर असेल तर यादिवशी त्या व्यक्तीला सोने देऊन नाते नव्याने जोडता येईल. परिस्थिती अनुकूल ठरेल.
मकर : मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी राम मंदिर तसेच हनुमान मंदिर व जमल्यास शनी मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे. गरिबांना अन्नदान करावे, त्यामुळे त्यांची साडेसातीची पीडा कमी होऊ शकते.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गेचे दर्शन घेऊन दुर्गा स्तोत्र म्हणावे. त्याचबरोबर शनी मंत्र म्हणत एक जपमाळ ओढावी. या साडेतीन मुहूर्तावर केलेल्या नामजपाचा उपयोग होऊन अडलेली कामे मार्गी लागतील.
मीन : मीन राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी ११ वेळा रामरक्षा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे. त्यामुळे त्यांचे अस्थिर मन स्थिर होऊन रखडलेल्या कामांना गती मिळू शकेल.