शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय, हे बदल करा By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:17 PM 2021-03-23T17:17:03+5:30 2021-03-23T17:26:41+5:30
आपण जिवंत आहोत पण जगत नाहीये, आपण श्वास घेतोय तरी घुसमट होतोय, आपण सगळ्यांच्या संपर्कात आहोत, तरी एकटे पडलोय, घरबसल्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तरी समाधान कुठेच मिळत नाहीये, या आणि अशा अनेक गोष्टींची तुम्हाला कधी जाणीव झाली आहे? आजच्या काळात दहा पैकी सात जण या प्रश्नांनी ग्रासलेले आहेत. याचे कारण आहे आपले संकुचित झालेले जीवन आणि बैठी जीवनशैली! परिस्थिती कितीही बिकट असो, मनस्थिती उत्तम ठेवता आली पाहिजे. परंतु तसे करण्यात नेमके कोणते अडथळे येत आहेत, ज्यामुळे आपल्याला सतत शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत आहे, हे जाणून घेऊया. सूर्यप्रकाशाचा अभाव : कधी काळी एकेका सुटीची वाट पाहणारे आपण वर्षभर घरी बसून काम करत आहोत. ऑफिसमध्ये तरी ठराविक वेळेत सुटका होत होती, परंतु घरून काम करताना सकाळची दुपार आणि दुपारची रात्र कधी होते, हेदेखील कळत नाही. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त यापासून आपण फार दूर गेलो आहोत. सूर्यप्रकाश सबंध जीव सृष्टीला नव संजीवनी देतो आणि आपण हाती राहून ते सुख गमावत आहोत, यामुळे नकळत शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. म्हणून काहीही झाले तरी प्रभात फेरी, सूर्य नमस्कार किंवा सकाळी सूर्यप्रकाशात प्राणायाम करण्याची सवय लावून घ्या.
अतिरिक्त काम : तणावग्रस्त व्यक्ती एकतर निपचित, उदास पडून राहते नाहीतर स्वतःला कामात झोकून देते. या दोन्हीचा अतिरेक शरीराला घातकच ठरणारा आहे. शरीर हे देखील एक यंत्र आहे. त्याला पुरेशी विश्रांती दिली नाही, तर ते कधी आणि कसे बंद पडेल हे सांगता येत नाही. कामाचा ताण केवळ मेंदूवर नाही तर तनामनावर दिसून येतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत राहतो.
अपुरी झोप : दिवसभर कॉम्पुटर, मोबाईल, टीव्ही यांचा आपल्या मेंदूवर आणि डोळ्यावर ताण पडत असतो. त्यांना कार्यान्वित करण्यासाठी पुरेशी झोप मिळायला हवी. मात्र, आपल्या बिघडलेल्या जीवनशैली मुळे रात्री जागरण आणि उशिरा उठणे यामुळे दिवसाचा समतोल बिघडतो. झोप नीट झाली नाही की चिडचिड होते, डोकं दुखतं, अस्वस्थ वाटतं. म्हणून दिवसभराच्या गॅझेट वापरानंतर किमान रात्री झोपण्याआधी तासभर आणि सकाळी उठल्यानंतर तासभर गॅझेट्स चा वापर टाळावा. म्हणजे शांत झोप लागेल.
व्यायामाचा अभाव : बैठी जीवनशैली वजन वाढीला कारणीभूत ठरते. वजन वाढीमुळे आळस चढतो आणि आळसामुळे व्यायामाचा कंटाळा येतो. हे दुष्ट चक्र भेदायचे असेल, तर रोज थोड्या थोड्या व्यायामाची सवय लावून घ्यावी. १२ सूर्यनमस्कार, दोरीच्या १०० उड्या, हाता-पायाच्या हालचालीचे २०-२० प्रकार असे थोडेच परंतु नित्यनेमाने केलेले व्यायाम प्रकार तनामनाला उभारी देतील.
नकारात्मक विचार : झोपून उठल्यावर सगळे प्रश्न, विचार, समस्या वेताळासारख्या मानगुटीवर येऊन बसत असतील. तर ते विचाराचे भूत मानगुटीवरून काढून बाजूला ठेवा. सबंध दिवस आपल्याला त्यांच्या बरोबरच घालवायचा आहे. परंतु उठल्यावर पहिला एक तास हा फक्त माझा आहे. या एका तासात मी स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. असे ठरवून टाका. यासाठी आवडते संगीत, बागकाम, नामस्मरण अशा गोष्टींचा आधार घ्या. हा एक तास तुमच्या पूर्ण दिवसावर जादूची काडी फिरवण्याचे काम करेल.