२०२५ची पहिली विनायक चतुर्थी: ९ राशींना शुभदायक काळ, बक्कळ लाभ; अपार सुख, बाप्पाची कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:07 IST2025-01-02T07:07:07+5:302025-01-02T07:07:07+5:30

सन २०२५च्या पहिल्या विनायकी चतुर्थीचा कोणत्या राशीवर शुभ प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

इंग्रजी नववर्ष २०२५ सुरू झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच विनायक चतुर्थीचा शुभ योग जुळून आला आहे. ०३ जानेवारी २०२४ रोजी सन २०२५ मधील पहिली पौष महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते. प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते.

विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपवास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ‘ॐ सिद्धिविनायकाय नम:’, ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ वेळा तर कमाल यथाशक्ती जप करून व्रतपूर्ती करावी, असे सांगितले जाते.

प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे सन २०२५ वर्षाची सुरुवात आणि सांगता विनायक चतुर्थीने होणार आहे. एकूणच ग्रहस्थिती पाहता पहिली विनायक चतुर्थी कोणत्या राशींना शुभकारक तसेच गणरायाचे शुभाशिर्वाद प्राप्त करून देणारी ठरू शकते, ते जाणून घेऊया...

मेष: नवनवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने नवीन वर्ष शुभदायक ठरणारे राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडता कामा नये. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीचे बोलावणे येऊ शकेल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ: नववर्षाची सुरुवात अनेक अडचणी दूर करणारी ठरेल. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळत पडलेले एखादे काम चुटकीसरशी होऊन जाईल. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. अनेक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. भाग्याची साथ राहील. नोकरीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. वाहने जपून चालवा. घाईघाईत कामे करू नका.

मिथुन: नवीन वर्षात परिस्थिती अनुकूल होईल. सुरुवातीला काही अडचणी असतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. क्रोधाला आवर घातला पाहिजे. नाहीतर लोक दूर जातील. आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करता कामा नये. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. शांतचित्ताने कामे करत राहा. शुभ फळे मिळतील.

कर्क: मनात उत्साह राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांची प्रगती होईल. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. फक्त कामेच करत राहाल तर मनावरील ताण वाढेल. कामे करत असतानाच आवडत्या छंदासाठी आवर्जून वेळ काढा. काहींना तब्येतीच्या तक्रारी असतील. जीवनसाथीशी वाद टाळा. अचानक धनलाभ होईल. वाहने हळू चालवा.

सिंह: चांगली फळे मिळतील. नवीन संधी मिळेल. घराच्या देखभालीसाठी वेळ द्यावा लागेल. एखाद्या कामात बराच वेळ गुंतून पडाल. इतरांच्या मदतीला धावून जावे लागेल. कार्यक्षेत्रातील कामे आणि जनसेवेतील जबाबदाऱ्या यांचा समतोल सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. सगळी कामे आटोक्यात येतील. चांगले अनुभव येतील.

कन्या: नोकरी, व्यवसायात सतत व्यस्त राहाल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ती पेलताना लोकांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सही करताना खबरदारी घ्यावी. नियम आणि अटी यांचे उल्लंघन होऊ देऊ नका. व्यवसायात मालाची विक्री चांगली होईल. घरगुती वाद वाढवू नका. नोकरीत बदलीला सामोरे जावे लागेल. मित्रांच्या सहवासात वाहवत जाऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ: विविध आघाड्यांवर यश देणारा काळ ठरेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गृहसौख्यात वाढ होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास घडून येईल. प्रवासात सतर्क राहा. नोकरीत अनुकूल बदल होतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. समाजात तुमचा मान वाढेल.

वृश्चिक: आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. सुख शांती मिळेल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल.

धनु: सुरुवातीला काही मोहाचे प्रसंग येतील. त्यात अडकता कामा नये. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बोलण्यावर ताबा ठेवला पाहिजे. आर्थिक उलाढाली जपून करा. अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांशी सख्य राहील. जीवनसाथीचे मन मोडू नका. एखादा प्रस्ताव ठेवला तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मकर: हाती पैसा येईल. मात्र, तो खर्च होईल. प्रवासात सतर्क राहा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. त्यामुळे भुर्दंड सोसावा लागू शकतो. मोहापासून दूर राहा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. काहींना तीर्थयात्रा घडून येईल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. फायदा होऊ शकतो. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कुंभ: प्रगतीला चालना देणारा काळ राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाची कामे प्रयत्नांती पूर्ण होतील. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. कायद्याची बंधने पाळा. चोरी, नुकसान यापासून सावध राहा. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

मीन: चांगल्या घटना घडतील. भाग्याची चांगली साथ मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. नातेवाइकांच्या भेटी होतील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नशिबाचा कौल मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.