पहिला श्रावणी सोमवार: ५ राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा; धनलाभ संधी, नागपंचमीला शुभ योग! By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:07 AM 2023-08-21T07:07:07+5:30 2023-08-21T07:07:07+5:30
First Shravani Somvar And Nag Panchami 2023: पहिल्या श्रावणी सोमवारी शुभ योगात नागपंचमी असून, काही उपाय तुम्हाला अतिशय लाभदायी ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... निज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. चातुर्मासातील श्रावणात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते. निसर्गाची सांगड असलेली श्रावणातील व्रते सांस्कृतिक, धार्मिक आणि परंपरांच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहेत. व्रताचरणांमागे जीवनशैली उंचावण्याचा, निसर्गाशी संबंध दृढ करण्याचा आणि परंपरा कायम ठेवण्याचा समृद्ध विचार असल्याचे पाहायला मिळते.
यंदाच्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक श्रावण मास. अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर आता निज श्रावणारंभ झाला असून, पहिला श्रावणी सोमवार २१ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी शिवपूजनानंतर शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करावेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी आहे.
श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. या दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत नाहीत. संस्कृती, परंपरांमध्ये नागपंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार हा चंद्राला समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच सोमवार महादेव शिवशंकराचा वार मानला जातो. त्यामुळे महादेवांसह चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते. तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी आणि नागपंचमीला शुभ नावाचा एक उत्तम योग जुळून येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. या योगात केलेले काम शुभता तसेच शुभ फलांची प्राप्ती करून देते, असे म्हटले जाते. अनेकार्थाने शुभ मानला गेलेला हा दिवस कोणत्या ५ राशींसाठी पुण्यफलदायी तसेच लाभदायी ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
मेष राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी शुभ ठरू शकेल. सकाळपासून उत्साह वाटू शकेल. घरात धार्मिक वातावरण असेल. लक्झरी वस्तूंची खरेदी करू शकता. कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांचा पूर्ण पाठिंबा असेल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. गुंतवणुकीची योजना आखत असतील, तर वेळ खूप अनुकूल आहे. नोकरदार लोकांना करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच भाग्योदयासाठी सोमवारी विशेष व्रत ठेवावे. शिवलिंगावर दूध, पाणी, दही, बेलपत्र, अक्षत, धतुरा, गंगाजल अर्पण करून पूजन करा. शिव चालिसाचे पठण किंवा श्रवण करावे.
कर्क राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी यशकारक ठरू शकेल. शुभ योगामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्राचीही भेट होईल. ज्याचा फायदा होईल. मालमत्ता खरेदीच्या दिशेने यश मिळेल. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील. यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची हानी करण्यात विरोधक अयशस्वी ठरतील. मन प्रसन्न राहील. कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढऱ्या वस्तू दान करा.
कन्या राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला शुभ योगाचा विशेष प्रभाव राहू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. बुद्धिमत्तेने आणि कार्यक्षमतेने सर्व कामे सहज पूर्ण कराल. जवळच्या व्यक्तीसोबत सुरू असलेले मतभेद संपतील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. धनवृद्धीसाठी शुभ संयोग घडू शकतील. भावंडांचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात दिवस घालवाल. चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाइफ पुढे जाईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पाच बेलपत्रांवर पांढर्या चंदनाचे तिलक करून शिवलिंगावर अर्पण करा. शिवाष्टकांचे पठण किंवा श्रवण करा.
धनु राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी लाभदायी ठरू शकेल. भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकाल. परदेशातून चांगला नफा मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ राहील. वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांसोबत कोणत्याही कार्याबद्दल चर्चा करू शकता. धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न होईल. पैशांमुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. मित्रांसोबत मनोरंजक क्षण घालवाल. काही महत्त्वाची माहिती मिळेल. व्यावसायिक प्रगती आणि मनोकामना पूर्तीसाठी सोमवारी शिवलिंगावर दुधाभिषेक करावा. यथाशक्ती ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
मीन राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी शुभ फलदायी ठरू शकेल. नोकरदारांना इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करू शकता. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जनतेचे सहकार्यही मिळेल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. विद्यार्थी शिक्षणात चमकदार कामगिरी करू शकतील. दिवस चांगला जाईल. अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी सोमवारी व्रत करून शिवलिंगावर गौरी शंकर रुद्राक्ष अर्पण करा. सकाळ-संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.