अन्न ज्योतिष सांगते तुमच्या खाण्याच्या आवडीवरून तुमचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:40 PM 2022-07-19T17:40:23+5:30 2022-07-19T17:53:24+5:30
ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीनुसार तर हस्तरेषा शास्त्रात हाताच्या रेषेद्वारे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राची आणखी एक शाखा म्हणजे अन्न ज्योतिष! यामध्ये व्यक्तिमत्व-भविष्य जाणून घेण्यासाठी व्यक्तीच्या अन्न पदार्थाच्या आवडी निवडी तपासल्या जातात आणि त्यावरून भविष्य वर्तवले जाते! काही लोक जगण्यासाठी खातात तर काही जण खाण्यासाठी जगतात. अर्थात ही दोन टोकं झाली. पण याच सवयींवरून माणसाचा स्वभाव घडत असतो. तुमचा स्वभाव पुढीलपैकी कोणत्या गटात मोडतो ते बघा आणि तुमचे भविष्य जाणून घ्या!
खाण्यात आनंद शोधणारे लोक: आम्ही सारे खवय्ये, अशा गटात मोडणारे लोक 'जाऊ तिथे खाऊ' असा नियम राबवतात. खाणं आणि गाणं हे त्यांच्या जीवनात आनंदाचे दोन मुख्य स्रोत असतात. अशा लोकांना नवनवीन खाद्यपदार्थांची चव घ्यायला आवडते. डाएट आणि त्यांचे वैर असले तरी ते जगण्याचा मनमुराद आनंद घेतात आणि इतरांनाही भरपूर आनंद देतात. त्यांच्यासाठी अन्न हे पूर्णब्रह्म असते. मात्र आनंदाच्या भरात भरभर खाण्याची सवय त्यांच्या पोटाच्या विकारांसाठी कारणीभूत ठरते.
सावकाश खाणारे लोक : असे लोक थोडे अंतर्मुख असतात. खाण्याच्या बाबतीत ते निवडक गोष्टींचा आस्वाद घेतात, तेही चार चौघात नाही तर स्वतंत्र! त्यांना मित्र कमी असतात. कोणाबरोबर पार्टी करत खाण्याची चंगळ त्यांना रुचत नाही. ते फार तर कुटुंबाबरोबर जेवतील नाहीतर एकटे जाऊन शांतपणे पदार्थाचा आस्वाद घेतील. असे लोक थोडे आतल्या गाठीचे असतात. ते स्वतःचा टिफिनसुद्धा कोणाशी शेअर करत नाहीत, मग सिक्रेट्स तर दूरची गोष्ट आहे! असे लोक विचारपूर्वक काम करतात त्यामुळे त्यांच्या चुकाही कमी होतात. त्यांचा संयमी बाणा त्यांना सुदृढ आरोग्य देतो.
खाईन तर तुपाशी: ही म्हण काही मंडळींना तंतोतंत लागू होते. असे लोक खाण्याच्या बाबतीत जराही तडजोड करत नाहीत. त्यांना पदार्थाची चवही जिथल्या तिथे लागते. ते एकवेळ उपाशी राहतील पण मनपसंत जेवण मिळेपर्यंत काहीबाही खाऊन भूक भागवणार नाहीत. हाच स्वभाव त्यांना करिअरच्या बाबतीत एकतर यशस्वी करतो नाहीतर मागे ठेवतो. तडजोड न करण्याची वृत्ती काही बाबतीत चांगली तशी काही बाबतीत ती वाईटही असते. याचा मध्य साधणे त्यांच्या तत्वात बसत नाही.
गोड खाऊ लोक : गोड खाणाऱ्यांमध्ये तीन कॅटेगरी असतात. कमी गोड खाणारे, जास्त गोड खाणारे आणि मिट्ट गोड खाणारे! त्यातल्या तिसऱ्या कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर असे लोक गोड खाण्यासाठी काहीही निमित्त शोधून काढतात. थोडक्यात समाधान मानणारे ते नाहीत. त्यांना गोड पदार्थ आनंद घेत खायला फार आवडते. हाच गोडवा त्यांच्या स्वभावातही उतरतो. ते जिथे जातील तिथे आपल्या स्वभावाची साखर पेरत असतात. मात्र अशा लोकांना अतिगोड खाण्याच्या सवयीमुळे कमी वयात मधुमेहाशी सामना करावा लागतो.
तिखट खाऊ लोक: काही लोक गाजर खावे तितक्या सहजपणे मिरच्या खातात. यांना सगळे पदार्थ जळजळीत, मसालेदार, तिखट असलेले आवडतात. जेवणात तिखट पदार्थ नसेल तर एक घासही त्यांच्या घशाखाली उतरत नाही. असे लोक एकवेळ तेल, तिखट, मीठ पोळीशी लावून खातील पण साध्या भाजी, कोशिंबिरीकडे ढुंकूनही बघणार नाहीत.या लोकांचे स्वभावही तिखट असतात. एक घाव दोन तुकडे! पण ते जीवनाचा आस्वाद घेत जगतात. मिळमिळीत जेवण जसे त्यांना आवडत नाही तसे मिळमिळीत जगणेही त्यांना रुचत नाही.
सात्विक आहार करणारे : काही लोक अगदी साधे पदार्थही चवीने खातात. जे मिळेल ते गोड मानतात. जेवणात काही कमी जास्त झालं तरी तक्रार करणे त्यांच्या स्वभावातच नसते. असे लोक कुठल्याही ठिकाणी पटकन सामावून जातात. तडजोडीची वृत्ती त्यांना समाधानी ठेवते. खडतर आयुष्याचा अनुभव पाठीशी असल्याने ते कधीच अन्नाला नावं ठेवत नाहीत. जे दोन घास मिळतील ते देवाचा प्रसाद समजून ग्रहण करतात. अशा लोकांना आरोग्याच्या फार तक्रारी नसतात. गरीब असो नाहीतर श्रीमंत त्यांना हर स्थितीत पिझ्झा बर्गर पेक्षा कष्टाची मीठ भाकरी जास्त खुणावते!