गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:05 AM2024-10-16T11:05:55+5:302024-10-16T11:20:09+5:30

आगामी काळात काही राशींना बोनस, नवीन नोकरीची संधी, बचत करण्यात यश, गुंतवणूक तसेच व्यापारात नफा प्राप्त होऊ शकतो. दिवाळी शुभ ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

कोजागरी पौर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंत अनेक शुभ योग जुळून येत आहेत. अश्विन महिन्याचा उत्तरार्ध विशेष योगांचा ठरत असल्याचे त्याचा लाभ, फायदा अनेक राशींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ग्रहाच्या गोचरामुळे गजकेसरी, महालक्ष्मी राजयोग जुळून येत आहेत.

कोजागरी पौर्णिमेला चंद्र गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत असून, हे गोचर शुभ मानले गेले आहे. तसेच १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत चंद्र वृषभ राशीत असेल. या राशीत गुरु ग्रह विराजमान असल्यामुळे गजकेसरी योग जुळून येत आहेत. तसेच याच दिवशी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ कर्क राशीत प्रवेश करत आहे.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे मंगळाचे कर्क राशीत होणारे गोचर शुभ मानले गेले आहे. तसेच चंद्र आणि मंगळ यांच्या युतीने महालक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. गुरु आणि शुक्र अनुक्रमे वृषभ आणि वृश्चिक राशीत असून, यामुळे समसप्तक योग जुळून येत आहे. दिवाळीपर्यंत या राजयोगांचा काही राशींना सर्वोत्तम फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...

मेष: महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. भौतिक सुख मिळू शकते. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. चांगला आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या आत एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. तसेच, यावेळी, ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे त्यांच्यासाठी चांगले लाभ होऊ शकतात. या काळात तुमचे आईसोबतचे नाते चांगले राहील.

वृषभ: महालक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबत संपत्तीत वाढ होऊ शकते. केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळू शकते. भविष्यासाठी काही योजना आखू शकता. करिअरच्या क्षेत्रात खूप यश मिळू शकते. नोकरीच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. याचा फायदा मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळू शकते. मेहनतीमुळे चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होण्याची संधी मिळू शकेल. बचत करणे शक्य होऊ शकेल.

कर्क: विविध क्षेत्रात यश मिळवू शकता. करिअरच्या क्षेत्रात अनेक नवीन संधी मिळू शकतात. बोनस मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाबद्दल बोलायचे तर भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट आणि स्टॉकमधून भरपूर पैसा कमवण्याची संधी मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनसाथीसोबत वेळ चांगला जाईल.

कन्या: मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळणार आहे. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. केलेल्या कामाचा आनंद आणि समाधान लाभेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

तूळ: कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जास्त पैसे वाचवू शकाल. वैयक्तिक आयुष्य पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

वृश्चिक: महालक्ष्मी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. नशीब साथ देईल. नोकरदार कठोर परिश्रम करतील आणि भाग्य त्यांना अनुकूल ठरेल. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. शुभ ठरू शकेल.

धनु: देवी लक्ष्मीच्या कृपेने ध्येय साध्य करू शकाल. सर्व प्रकारची परिस्थिती सहजतेने हाताळू शकाल. मनावरील ओझे हलके होईल. गुंतवणूक करायची असेल तर चांगला नफा मिळू शकेल. इतरांना चांगला सल्ला देऊ शकाल. मनात एखादी बिझनेस आयडिया येईल, ती लगेच अंमलात आणू शकता. फेस्टिव्हलमुळे नवीन प्रोडक्ट्सचा समावेश करण्याची संधी मिळेल. नोकरी, शिक्षण किंवा परदेशात जायचे आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची वाट सापडेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता.

कुंभ: भगवती नारायणी देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल. जीवनात जे काही संकटे येत असतील ती हळूहळू दूर होतील. जे काम हाती घ्याल ते सहज पूर्ण होऊ शकेल. गुंतवणुकीची संधी मिळेल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकेल. कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. नवीन माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जावे लागेल. तरच फायदा होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.