चातुर्मासात गजकेसरी योग: ८ राशींना कामात यश, अनेक फायदे; सुवर्ण संधी, लाभाचा सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:41 AM2024-07-20T11:41:21+5:302024-07-20T11:54:17+5:30

चातुर्मास सुरू असून, गजकेसरी योगासह जुळून आलेल्या शुभ योगांचा सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळू शकतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

उत्तर भारतीय पंचांगानुसार तिथे श्रावण मास सुरू होत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये ०५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. जुलै महिन्याची सांगता होत असताना ग्रहांच्या गोचरामुळे अनेकविध योग जुळून येत आहेत. चातुर्मासातील महत्त्वाचा सण गुरुपौर्णिमा आहे.

गुरुपौर्णिमेपासून पुढील काही दिवस अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत. सूर्य आणि शुक्राचा कर्क राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे. मंगळ आणि गुरूचा वृषभ राशीत कुबेर योग जुळून येत आहे. शनी मूळ त्रिकोण कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार करत आहेत.

तसेच गुरु आणि चंद्र केंद्र स्थानी येत असल्यामुळे गजकेसरी योग जुळून येत आहे. मंगळ रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. नवमपंचम योगही जुळून येत आहे. आगामी काळात अनेकविध योग जुळून येत असल्याचा काही राशींना फायदा होऊ शकतो. सर्वोत्तम संधी, यश-प्रगती, पद-पैसा वृद्धी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

वृषभ: प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती वाढू शकेल. एखाद्याला दिलेली उधारी परत मिळू शकते. गजकेसरी योग व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांना लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. उच्च अधिकारी आनंदी होऊन बढती करू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना बरेच फायदे मिळू शकतात. नवीन नोकरीसह चांगली बढती आणि पगार मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: नशिबाची पूर्ण साथ लाभेल. शक्य तितके काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न करतात ते यशस्वी ठरतील. सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांशी संबंधित असलेल्यांना चांगला नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्यावा. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मन खूप प्रसन्न राहू शकेल. वेळ मौजमजेत आणि मनोरंजनात जाईल.

सिंह: गजकेसरी योग आनंददायी ठरू शकेल. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातून भरपूर कमाई होण्याची शक्यता आहे. पैसे मिळवण्याच्या नादात चुकीच्या मार्गावर जाणार नाही ना, यावर लक्ष ठेवा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल ठरू शकेल. नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल.

कन्या: बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अतिशय शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्याने अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. बोलताना थोडे सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ राहणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल.

तूळ: मित्र किंवा हितचिंतकांच्या सहकार्याने सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी वेळ खूप चांगला जाईल. एखाद्या प्रिय व्यक्तीला अचानक भेटू शकता.

धनु: उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ कामांवर लक्ष केंद्रित करा. आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकाल. बहुतांश प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. आळशीपणामुळे चांगल्या संधी हातून सुटणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. वेळेचे व्यवस्थापन आणि पूर्ण झोकून देऊन काम केल्यास यश मिळेल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.

मकर: गजकेसरी योग फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. भगवान शंकराच्या कृपेने यश मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतो. मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत आहेत. लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची साथ लाभू शकेल.

मीन: नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकेल. पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.