Ganesh Festival 2021: गणेशाचे मूळ शीर ठेवलेल्या ‘या’ गुहेत दडलीयत अद्भूत रहस्ये? पाहा, मान्यता By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 09:51 AM 2021-09-14T09:51:16+5:30 2021-09-14T09:58:32+5:30
Ganesh Festival 2021: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा आणि काय आहे त्याचे रहस्य? जाणून घेऊया... केवळ नामस्मरणाने उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होणाऱ्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुरू आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचा जन्मोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्दशीपर्यंत अगदी उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा केला जातो. (place where the original head of ganapati is kept)
महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला.
गणपती बाप्पाच्या जन्माची कथा फारच रंजक आहे. यातून अनेक संदेश आपल्याला देण्यात आले आहेत, अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये गणपतीला प्रथमेशाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. गणपती पूजन न केल्यास विघ्न येतात, याच्याही अनेक कथा पुराणात आढळून येतात.
गणपती जन्मानंतर महादेव शिवशंकरांनी गणपतीवर त्रिशुळाने जोरदार प्रहार केला. यानंतर गणपतीला गजमुख लावण्यात आले. मात्र, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा आणि काय आहे त्याचे रहस्य? जाणून घेऊया...
महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची ख्याती आहे. पार्वती देवीने सुंदर अशी मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला, हे सर्वश्रुत आहे. गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता. एक दिवस स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली. आईचा आदेश शिरसावंद्य मानून गणपती दाराजवळ बसून राहिला.
तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून, पार्वती देवीच्या आदेशावरून तो तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले. मात्र, काही केल्या तो ऐकेना. महादेवांनी हर तऱ्हेने गणपतीला समजावले. मात्र, तो हटला नाही. शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. महादेवांनी त्रिशुळाचा जोरदार प्रहार गणपतीवर केला.
महादेवांच्या त्रिशुळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या. अत्यंत क्रोधीत झाल्या. माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत केले नाही, तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वती देवींनी महादेवांना बजावले. शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर त्यांना एक गज दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले.
महादेवांनी गजाचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले. यानंतर सर्व देवांनी गणपतीला अनेक शक्ती, अस्त्र-शस्त्रे प्रदान केली. उत्तराखंडमधील कुमाऊं मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून १६० कि.मी. अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोलीहाट पर्वतरागांमधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक गुहा आहे.
याच गुहेत गणपतीचे मूळ शीर ठेवण्यात आले आहे, असे सांगितले जाते. येथे गणपतीची एक मूर्ती आहे, त्यास आदी गणपती म्हटले जाते. येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात, अशी मान्यता आहे. पौराणिक संदर्भानुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखले पुराणात मिळतात.
या गुहेच्या चारही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते. यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे मंदिर आहे. पाताल भुवनेश्वर येथील मान्यतेनुसार, आदि गुरू शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते, असे सांगितले जाते. इ. स. पूर्व ७२२ च्या दरम्यान शंकराचार्यांना या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले, असे सांगितले जाते.
आजच्या काळात पाताल भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. केवळ भारतातील नाही, तर देश, विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या चार धामांचे सुलभ दर्शन या पाताल भुवनेश्वर या गुहेत होते, असे म्हणतात.
पाताल भुवनेश्वर या गुहेत चारही युगांचे म्हणजेच कृत, द्वापार, त्रेता आणि कलियुगाचे प्रतीक म्हणून चार दगड आहेत. यापैकी कलियुगाचा प्रतिक असणारा दगड दिवसेंदिवस वरच्या बाजूला सरकत आहे. हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल, तेव्हा कलियुगाचा अस्त होईल, अशी मान्यता आहे. या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते, असे सांगितले जाते.
बद्रीनाथमध्ये बद्री पंचायतची शिलारूप मूर्ती आहे. यात यम, कुबेर, वरुण, लक्ष्मी, गणेश आणि गरुड यांचा समावेश आहे. तक्षक नागाची आकृती येथील एका मोठ्या दगडावर असलेली पाहायला मिळते. या पंचायतावर बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती दिसते. कालभैरवाच्या जीभेचे दर्शनही येथील गुहेत होते, असे सांगितले जाते.