चांगल्या कार्याचा करा आज शुभारंभ; कारण आहे गुरूपुष्यामृत योग!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 28, 2021 04:50 PM2021-01-28T16:50:12+5:302021-01-28T16:56:34+5:30

आज पौष शुद्ध पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत हे दोन्ही योग एकत्र जुळून आले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हा शुभयोग राहणार आहे. २७ नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र धनलाभ करून देणारे आहे. त्यात पौष पौर्णिमा म्हणजे दुग्धशर्करा योग म्हटले पाहिजे. या मुहूर्तवार चांगल्या कार्याची सुरुवात करावी, नवीन वस्तूंची, सुवर्णाची किंवा अन्य महत्वपूर्ण गोष्टींची खरेदी करावी असे म्हणतात. या मुहूर्तवार केलेल्या गोष्टी वर्धिष्णू होतात, असेही म्हटले जाते. तर आजच्या सिद्ध योगाचा लाभ जरूर करून घ्या.

गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात यश मिळविण्यासाठी त्याची सुरवात या दिवशी केली जाते.

या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी.

गुरुपुष्यामृत हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे.

पूर्वी या मुहूर्तावर ज्ञानदानास प्रारंभ केला जात असे. याशिवाय, धर्म, कर्म, मंत्र, अनुष्ठान, इ गोष्टींचा शुभारंभ केला जातो. नशीब बदलणारा, दारिद्रय दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे.