Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाला राशींनुसार बहिणीला द्या भेटवस्तू; मिळवा उत्तम लाभ, नातेसंबंध होतील दृढ By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:05 AM 2021-08-19T09:05:15+5:30 2021-08-19T09:10:28+5:30
Raksha Bandhan 2021: भावा-बहिणींचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या बहिणीच्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास ते दोघांसाठी लाभाचे ठरेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या... भावा-बहिणींचे नाते अधिक वृद्धिंगत व दृढ करणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. मनगटावर राखी बांधून बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. तर बहिणीचे कायम संरक्षण करत राहीन, अशी ग्वाही भाऊ देत असतो.
सन २०२१ मध्ये रविवार, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या दिवशी दिलेल्या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे, लाभदायक मानले जाते. रक्षाबंधनाची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या बहिणीच्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास ते दोघांसाठी लाभाचे ठरेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या...
मेष - मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे बहिणींना लाल रंगाशी संबंधित भेटवस्तू आपण देऊ शकता. कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वस्तू, शोभेच्या वस्तू आदी लाल रंगाच्या भेटवस्तू देऊ शकता.
वृषभ - वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या बहिणींना एखादा चांगला परफ्युम, रेशमी वस्त्र किंवा मोत्यांचा एखादा दागिना तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली भेटवस्तू देऊ शकता.
मिथुन - मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या बहिणींना हिरव्या रंगाच्या भेटवस्तू जसे पेन, सेंट देऊ शकता. याशिवाय हिरव्या रंगांनी चितारलेली निसर्गाची तसबिरी, फोटो फ्रेम भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
कर्क - कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या बहिणींना पांढऱ्या रंगाशी संबंधित एखादी भेटवस्तू देऊ शकता. एखादी चांदीची वस्तू, मोत्यांचा दागिना, पांढऱ्या रंगाची मिठाई, वस्त्र यांसारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
सिंह - सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे सिंह राशीच्या बहिणींना सोन्याचा दागिना, महागडे रत्न, लिमिटेड एडिशन वॉच, केशरी रंगाची मिठाई भेट म्हणून देऊ शकता.
कन्या - कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे कन्या राशीच्या बहिणीला हिरव्या रंगाच्या वस्तू, वस्त्रे, चांदीचा दागिना, धातूची मूर्ती, हिरव्या रंगाची मिठाई भेट स्वरुपात देऊ शकता.
तुळ - तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे तुळ राशीच्या बहिणींना एखादे रेशमी वस्त्र, चंद्राचा समावेश असलेली तसबीर, लाकडी कामे असलेली एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
वृश्चिक - वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या बहिणींना फुलदाणी, दागिना, लाल रंगाची मिठाई, हटके आणि आकर्षक भेटवस्तू देऊ शकता.
धनु - धनु राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे धनु राशीच्या बहिणींना केशरी रंगाचा मिठाई, पिवळ्या रंगाची वस्त्रे, धार्मिक पुस्तके, सोन्याचे दागिने अशा काही गोष्टी भेट म्हणून देऊ शकता.
मकर - मकर राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे मकर राशीच्या बहिणींना काळ्या किंवा निळ्या रंगाची वस्त्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भेट म्हणून देऊ शकता.
कुंभ - कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या बहिणींना महागडे ब्रेसलेट, नीलम रत्नाची अंगठी किंवा एखादी निळ्या खड्याची अंगठी, अॅन्टिक गोष्टी भेट देऊ शकता. तसेच आवडते पदार्थही स्पेशल ऑर्डरवर मागवू शकता.
मीन - मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे मीन राशीच्या बहिणींना अॅक्वा किंवा हिरव्या रंगाची वस्त्रे, पिवळ्या रंगाची एखादी वस्तू, पिवळ्या रंगाची मिठाई भेट म्हणून देऊ शकता.