Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग जुळून येत आहे; ऑक्टोबरपर्यंत 'या'पाच राशींनी सावध राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:16 PM2023-04-10T17:16:52+5:302023-04-10T17:19:57+5:30

Guru Chandal Yog 2023: गुरु आणि राहूच्या संयोगामुळे २२ एप्रिलपासून मेष राशीमध्ये गुरु चांडाळ योग तयार होत आहे. राहू आणि बुध हे ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून २२ तारखेला गुरु चांडाळ योग करतील. यानंतर राहु ऑक्टोबरमध्ये मीन राशीत जाईल. तोवर पाच राशीच्या लोकांना सुमारे ७ महिने संघर्षात काढावे लागतील. या योगाचा परिणाम बाराही राशींवर होणार असला तरी विशेषतः पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागेल.

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत राहू आणि गुरु एकत्र असल्यास गुरु चांडाळ योग तयार होतो. गुरु चांडाल योग हा सर्वात नकारात्मक योगांपैकी एक आहे. गुरु चांडाळ योगाचा वेळीच उपाय केला नाही तर कुंडलीतील सर्व शुभ योग निष्फळ ठरतात. असे मानले जाते की या योगामुळे व्यक्तीचे चारित्र्यही मलीन होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात. थोडक्यात वाईट घटनांचा हा काळ असतो. परंतु घाबरू नका; त्यावर प्रामाणिकपणे, डोळसपणे काम करत मात करणे आपल्या हाती आहे.

मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. या काळात दूरचा प्रवास करणार असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या पसंतीचे काम करूनही समाधान मिळणार नाही, त्यामुळेच करिअरशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अतिरिक्त खर्च टाळा आणि सेव्हिंग वर भर द्या. आराध्य देवाचे नामस्मरण करत रोज एक माळ जपा, लाभ होईल.

मिथुन राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसाय किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच अशुभ वार्ता मिळण्याची चिन्हे आहेत. मन अशांत असताना वाणीवर संयम ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला व्यावसायिक जीवनातही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये किरकोळ कारणांवरून बॉससोबतही वाद होऊ शकतात. पैसे आणि आरोग्याच्या बाबतीत तुमचे नुकसान होऊ शकते. दूरचे प्रवास शक्यतो टाळा. नियोजित काम संयमाने करा. तुमच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. संयम बाळगा, हे ही दिवस जातील. दत्तगुरूंचा जप लाभदायक ठरेल.

कन्या राशीच्या लोकांवर गुरु चांडाळ योगाचा नकारात्मक प्रभाव पडेल. या काळात प्रवासादरम्यान अनावश्यक खर्च टाळा. तणाव टाळण्यासाठी योगाभ्यास करा. या दरम्यान, स्वतःला शांत करण्यासाठी आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी देवाचे ध्यान करा. करिअर आणि कौटुंबिक अशांततेमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. गुरु चांडाळ योग तुमच्या राशीच्या आठव्या भावात बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरी व्यवसाय घर यांचे संतुलन राखताना तारांबळ उडेल, धीराने घ्या. वाहन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

धनु राशीच्या लोकांना गुरु चांडाळ योगामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी, त्याचा फायदा होईल आणि अपघात टळतील. या काळात तुमचे बजेट बिघडू शकते आणि तुमची आर्थिक स्थिती कमकुवत राहील. एखाद्या अज्ञात भीतीने चिंतेत राहाल आणि काहीतरी अप्रिय घडेल असे वाटत राहील. कामाच्या ठिकाणीही काही समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीत तुमच्या कामावर अधिकारी असमाधानी राहिले तर नोकरी गमवावी लागू शकते. सावध राहा. काम सचोटीने करा. व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. दैनंदिन खर्च वाढेल आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उपास्य देवतेची नित्य पूजा आणि आठवड्यातून एकदा उपास करा.

मकर राशीच्या लोकांसाठी त्यांच्या राशीतून चौथ्या घरात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. या संक्रमणादरम्यान तुमच्या जीवनातील अशांतता आणखी वाढू शकते. मानसिकदृष्ट्या अनेक प्रकारच्या गोंधळांना सामोरे जावे लागते. पती-पत्नीमध्ये काही जुन्या वादांवरून तणाव निर्माण होईल. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक नात्यावर खूप विपरीत होईल. या काळात तुम्हाला काही गोंधळाला सामोरे जावे लागू शकते. मन अशांत असल्याने नोकरी, व्यवसाय, अभ्यासात लक्ष लागणार नाही. त्याचा विपरीत परिणाम तुमच्या यशावर होऊ शकेल. प्रगतीत अडथळे निर्माण होतील आणि तुम्ही आणखी चिंताग्रस्त राहाल. शनी देवतेची उपासना तुम्हाला फलदायी ठरेल. मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे नित्यनेमाने पठण सुरु करा, लाभ होईल!