Guru purnima 2021 : गुरुंची पारख करून मगच गुरु निवडावा - स्वामी विवेकानंद By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:36 AM 2021-07-21T11:36:28+5:30 2021-07-21T11:48:04+5:30
Guru Purnima 2021 : गुरु शिष्यांच्या जोडीबाबत बोलताना स्वामी विवेकानंद व गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु खुद्द स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, गुरुभक्ती ही डोळसपणेच केली पाहिजे. रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना लहानपणी पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्यांना त्यांच्यात आपला शिष्य दिसला. त्यांनी अनेकदा विवेकानंदांना बोलावणे पाठवले. परंतु विवेकानंदांनी स्वत:च्या आत्मबुद्धीला पटल्यानंतरच परमहंस यांचे शिष्यत्त्व स्वीकारले. याउलट अनेक जण ढोंगी बाबा-साधूंकडे आकर्षित होऊन त्यांना गुरु समजण्याची चूक करतात आणि वाहवत जातात. हिंदीत एक मुहावरा आहे, `पानी पियो छानकर गुरु बनाओ जानकर' ज्याप्रमाणे मराठीत आपण म्हणतो, `ताकही फुंकून प्यावे' त्यानुसार गुरुंची निवड अतिशय डोळसपणेच केली पाहिजे. अन्यथा गढूळ पाणी जसे आपल्या आरोग्याला घातक ठरेल, तसे अयोग्य गुरु आपल्या आयुष्यासाठी घातक ठरू शकतील.
मग प्रश्न असा येतो, की गुरु कोणाला म्हणावे? जो योग्य मार्ग दाखवतो, तो गुरु! ही गुरु या शब्दाची अचूक व्याख्या आहे. हा मार्ग व्यावहारिक जगातला असो नाहीतर पारमार्थिक जगातला! परंतु, तो मार्गच चुकीचा असेल, तर आपण आपले ध्येय गाठू शकणारच नाही. म्हणून योग्य मार्गदर्शकाची आपल्याला पदोपदी गरज लागते. अगदी गुगल मॅपचे उदाहरण घ्या ना, योग्य पत्ता टाकूनही त्याने चुकीचा मार्ग दाखवला, तर आपल्याला पुन्हा केवढा मोठा प्रवास करावा लागतो? तसेच चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याने आपल्यालाही आयुष्यात मोठा प्रवास करावा लागू शकतो.
मार्गदर्शन करण्याच्या नावावर जे गुरु केवळ शिष्याचा पैसा आपल्याकडे खेचत असतील, ते गुरु नव्हेत. ज्ञान फुकट देऊ नये म्हणतात, अन्यथा त्याची किंमत राहत नाही. या नियमानुसार गुरुदक्षिणा त्यांनी अवश्य घ्यावी, परंतु शिष्याला लुबाडू नये किंवा पैशांसाठी अडवू नये. असे करणारे लोक निव्वळ पोटार्थी आणि स्वार्थी असतात. ते स्वत:चा आणि दुसऱ्याचा उत्कर्ष कधीच साधू शकत नाहीत.
संस्कृत मध्ये `गु' शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि `रु' शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. म्हणजेच जी व्यक्ती आपल्या आयुष्यात अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देते, तिलाच गुरु म्हणावे. त्या ज्ञानाचे, प्रामाणिकपणाचे, आत्मविश्वासाचे तेज गुरुंच्या चेहऱ्यावर दिसून येते व तेच तेज गुरुंकडून शिष्याला प्राप्त होते.
सद्यस्थितीत स्वयंघोषित गुरुंची संख्या पुष्कळ आहेत. जे स्वत:चा फोटो, पेन, वही, पुस्तक शिष्यांना सतत स्वत:जवळ बाळगायला सांगतात. परंतु, खऱ्या गुरुंना स्वत:चा प्रचार करावा लागत नाही, किंबहुना कोणी तसे केलेले त्यांना आवडतही नाही. ते केवळ शिष्य घडवण्यावर भर देतात. त्यांना शिष्याची प्रसिद्धी हवी असते, स्वत:ची नाही. याबाबत उदाहरण म्हणून सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे नाव घेता येईल. नव्या पिढीला एकवेळ सचिन माहीत असेल पण त्याचे गुरु नाही. हेच गुरुंचे ध्येय असते.
गुरु मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. गुरु आपल्या आसपासही असू शकतात. परंतु आपण त्यांना ओळखले पाहिजे. आपले हितचिंतक कोण आणि हितशत्रू कोण हा भेद करता आला, की गुरुभेटीचा दिवस दूर नाही. गुरुंच्या पेहरावावर, दिसण्यावर जाऊ नका, त्यांच्या ठायी असलेले ज्ञान, गुण, वागणुक यांचे परीक्षण करा आणि मगच गुरुंची निवड करा.