गुरुपुष्यामृत योग: ३ राशींना लाभच लाभ; ‘या’ ३ गोष्टी करा, लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:49 PM2022-07-27T16:49:15+5:302022-07-27T16:55:09+5:30

guru pushya yoga 2022: यंदाच्या गुरुपुष्यामृत योगावर अनेक अद्भूत शुभ संयोग जुळून येत असून, याचे महत्त्व, मान्यता आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना वरदान ठरणार, ते जाणून घ्या...

आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. श्रावणाला व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा राजा मानले जाते. आषाढ आणि श्रावण महिन्याच्या संधीकालात अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. (Guru Pushya Yoga 2022)

गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. यंदा सन २०२२ मध्ये २८ जुलै रोजी सकाळी ०७ वाजून ०४ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जुलै रोजी सकाळी ०६ वाजून १६ मिनिटांपर्यंत हा योग आहे. (Guru Pushya Yoga 2022 Date And Time)

ज्योतिषशास्त्रानुसार, याच दिवशी गुरु मीन राशीत वक्री होणार आहे. तसेच आषाढी म्हणजेच दीप अमावस्याही साजरी केली जात आहे. हा एक अनोखा योगायोग असल्याचे सांगितले जात आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु मानला जातो. अशा स्थितीत गुरुवारपासून या नक्षत्राचा आरंभ होत असल्यामुळे गुरुपुष्यामृत योग होत आहे. (Guru Pushya Yoga 2022 Astrology)

गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. (Guru Pushya Yoga Significance)

या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे.

पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.

शनी ही न्यायाची देवता मानली गेली आहे. आताच्या घडीला शनी आपले स्वामीत्व असलेल्या मकर राशीत वक्री चलनाने विराजमान आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरुपुष्यामृत योग आला आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असल्याने हा योग अतिशय शुभ मानला गेला आहे. शनीची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे.

गुरु पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून 'ओम् श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिन्यै धनधान्य समृद्धि देहि देहि नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणावा.

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ असते. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्हीसांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.

याशिवाय या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू इत्यादींचे सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असेही म्हटले जाते.

एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असतात.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे.

गुरुपुष्यामृत योगाचा तीन राशींच्या व्यक्तींना अत्यंत शुभ-लाभ मिळू शकतो. यातील पहिली रास कर्क असून, गुरुपुष्यामृत योग यशकारक ठरू शकेल. नोकरीत बढती मिळू शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. पैशाशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होतील. व्यवसायात अधिक फायदा होऊ शकेल. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योग अच्छे दिन घेऊन येणारा ठरू शकेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमचे सर्व काम पूर्ण समर्पण वृत्तीने कराल. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतील. कामाच्या ठिकाणी त्यांचे कौतुक होईल. एकूणच देवी लक्ष्मी त्यांच्यावर कृपा राहील.

गुरुपुष्यामृत योगावरच गुरु मीन राशीत वक्री होत आहे. गुरु हा मीन राशीचा स्वामी आहे. गुरुपुष्यामृत योग लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होईल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळेल.