Hanuman Jayanti 2021: 'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:51 PM 2021-04-25T12:51:52+5:30 2021-04-25T12:58:22+5:30
hanuman jayanti 2021 सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. (samarth ramdas swami established 11 hanuman maruti temple in maharashtra) महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. बहुतांश संतांनी उपासनेचे सामर्थ्य सर्वांना पटवून दिले आहे. मात्र, सामर्थ्याची उपासना किती महत्त्वाची आहे, हे सांगणारे थोर संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी.
समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम आणि हनुमानाला उपास्य मानून समाज प्रबोधन केले. बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात करताना रामदास स्वामींनी तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. (samarth ramdas swami established 11 hanuman maruti temple)
संघटना बांधायची, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासानेचे आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तीरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा, असे ध्येय समर्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थांनी आपले कार्य सुरू केले.
सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. एका दिवसात किंवा दोन दिवसांत या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे, असे काहीही नाही.
चाफळचा वीर मारुती - सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की, एक रस्ता चाफळला जातो. इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ येथे केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना समर्थांनी केली. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला, त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.
भीम मारुती/वीर मारुती - चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे सुमारे १०० मीटर चालत गेल्यावर रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आणखीन एक मंदिर आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच रौद्र मुद्रेत आहेत. दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
शिंगणवाडीचा मारुती - खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती, असेही या मारुतीला संबोधनले जाते. चाफळपासून साधारण एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेले रामघळ आहे. याच ठिकाणी इ.स. १६५० मध्ये समर्थांनी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. चाफळच्या आधी समर्थांचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगितले जाते.
माजगावचा मारुती - चाफळपासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. गावकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इ.स. १६५० मध्ये याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे.
उंब्रजचा मारुती - उंब्रज येथे तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इ. स. १६५० मध्ये समर्थांनी एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन गेले, असे सांगितले जाते.
मसूरचा मारुती - उंब्रजपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. पूर्वाभिमुख असलेली ही मारुती मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी अशीच आहे. इ.स. १६४६ साली या मंदिराची स्थापना समर्थांनी केली. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे.
शिराळ्याचा मारुती - सांगली जिल्ह्यातील शिराळे गाव नागांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील एस.टी. स्टँडजवळच हे मारुतीचे मंदिर आहे. इ.स. १६५५ साली समर्थ रामदास स्वामींनी येथे मारुतीची स्थापना केली. मूर्तीच्या डोक्यावर डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो.
शहापूरचा मारुती - कराड-मसूर रस्त्यावर १५ कि.मी. आणि मसूरपासून ३ कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. तेथून एक कि.मी. अंतरावर हे मारुती मंदिर आहे. इ.स. १६४५ साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते.
बहे बोरगावचा मारुती - सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे गाव आहे. या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल, अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली.
मनपाडळेचा मारुती - मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी इ.स. १६५२ मध्ये केली. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या ठिकाणी दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत, असे सांगितले जाते.
पारगावचा मारुती - या मारुतीला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती, असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वांत शेवटी स्थापलेला आणि सर्वांत लहान मूर्ती असलेला आहे.