Hanuman Jayanti 2023: हनुमंताप्रमाणे मन, मेंदू, मनगट ताकदवान बनवण्यासाठी आजपासून सुरु करा बलोपासना तसेच सूर्योपासना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 12:43 PM2023-04-06T12:43:53+5:302023-04-06T12:47:26+5:30

Hanuman Jayanti 2023: आज हनुमान जन्मोत्सव! हनुमंत भक्ती, युक्ती, शक्तीने श्रेष्ठ होते. आजचे युवक त्यांना आपला आदर्श मानतात. मात्र केवळ पूजा करून भागणार नाही तर त्यांच्यासारखे शरीर सामर्थ्य कमवायचे असेल तर त्यासाठी सूर्योपासनेची पारंपरिक पद्धत आजमावायला हवी. जेव्हा मनगटात बळ येते आणि ते बळ राष्ट्र हितासाठी वापरायचे आहे ही समज येते तेव्हाच राष्ट्राचा उद्धार निश्चित होतो!

मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. सुरुवात एका सूर्यनमस्काराने करा, हरकत नाही. पण सुरुवात करा आणि रोज एक नमस्कार घालत सातत्य ठेवा.

नेभळट, दुर्बल, गलितगात्र, निस्तेज, चैतन्यहीन मानव, कुटुंब, समाज, राष्ट्र, संस्कृतीचा उद्धार कसा करणार? शरीराला सशक्त बनवण्यासाठी सरळ उपाय आहे, तो म्हणजे सूर्यनमस्कार. सूयोपासनेमुळे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपण शरीराने स्वस्थ, मनाने सम व बुद्धीने जागृत होतो.

माणसाचे शरीर सशक्त तसेच मेहनत करणारे असले पाहिजे. शरीर निरोगी असेल, तरच अन्य भौतिक सुखांचा उपभोग घेता येईल. सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना असली, तरीदेखील तो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे शरीराच्या अंग उपांगाला व्यायाम मिळतो. सूर्यउपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते. सूर्याचे मंत्र म्हणत नमस्कार घालावेत. आबालवृद्धांसाठी ही उपासना आशीर्वादरूपी आणि आरोग्यवर्धक आहे.

शरीर चांगले असेल, तर मन निरोगी राहते. नित्य सूर्यदर्शनाने मानवाचे मन प्रभावी व प्रतिकारक्षम बनते. म्हणून रोज सुर्योदय आणि सूर्यास्त पहवा, असे शास्त्र सांगते.

सूर्य जगाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही आणि मोबदल्यात कोणाची उपेक्षाही करत नाही. प्रामाणिकपणे, अविरतपणे आणि तितक्याच तेजाने रोज उगवतो आणि मावळतो. परंतु जाण्याआधी संपूर्ण सृष्टीला जीवनदान देऊन जातो. निष्काम कर्मयोगाचा मोठा परिपाठ सूर्याकडून मिळतो, म्हणून त्याची नित्य उपासना करावी. रोज नित्यनेमाने आपले काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेची कमतरता कधीच जाणवत नाही.

सूर्योपासनेने बुद्धी तेजस्वी आणि प्रतिभासंपन्न होते. जीवनात बुद्धीला प्राधान्य देणाऱ्या ऋषींनी `ऊँ तत्सविर्तुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धीयो यो न: प्रचोदयात' ही सूर्य गायत्री उपासना मंत्र बनवला. या मंत्राचा आपणही वापर करावा. सूर्याला अभिवादन करावे आणि जीवन तेजस्वी बनवावे. मग तुम्ही सुद्धा सुरुवात करताय ना?