Holi 2022: अजब घटनांचे गजब वास्तव! देशातील ‘या’ गावांमध्ये २०० वर्षे होळी साजरी झाली नाही? पाहा, कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:09 AM2022-03-17T07:09:26+5:302022-03-17T07:14:29+5:30

भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जेथे होळी साजरी केली जात नाही. होळी न खेळण्यामागील कारणेही अजब आहेत. जाणून घ्या...

मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणून होळी साजरी केली जाते. देशभरात होळीचे विविध रंग पाहायला मिळतात. मथुरा, ब्रज, येथे तर अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. वैरभाव विसरून मैत्रीचा प्रेमाचा, आनंदाचा सण म्हणूनही होळीकडे पाहिले जाते. (Holi 2022)

वास्तविक पाहायला गेल्यास पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. मात्र, आधुनिक काळात होलिकादहन आणि धुळवड किंवा धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसते. सन २०२२ मध्ये १७ मार्च रोजी होळी म्हणजेच होलिकादहन आहे. तर, १८ मार्च रोजी धुलिवंदन आहे.

होळीचा हा रंगांचा सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या होळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे. संपूर्ण देश होळीच्या नानाविध रंगात न्हाऊन निघतो. मात्र, भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जेथे होळी खेळली जात नाही. होळी न खेळण्यामागील कारणेही अजब आहेत. जाणून घ्या...

झारखंडमधील बोकारो येथील कसमार दुर्गापूर भागात गेल्या १०० वर्षांपासून होळी खेळण्यात आलेली नाही. या गावातील स्थानिक एकमेकांना रंगही लावत नाहीत. होळी साजरी केल्याने गावात महामारी किंवा मोठी नैसर्गिक आपत्ती येईल, अशी भीती या गावातील लोकांना वाटते.

या गावातील राजाच्या मुलाचा मृत्यू होळीदिनी झाला होता. यानंतर ज्या ज्या वेळी गावात होळीचे आयोजन करण्यात आले, तेव्हा महामारीने या गावाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे राजाच्या आज्ञेवरून या गावात होळी खेण्याची प्रथा बंद करण्यात आली.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे असलेल्या डहुआ गावात गेल्या १२५ वर्षांपासून होळी साजरी करण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. १२५ वर्षांपूर्वी या गावातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होळीदिनी झाला होता. प्रमुख व्यक्तीच्या निधनामुळे संपूर्ण गावावर अज्ञान दहशत बसली. यानंतर कधीही या गावात होळी साजरी करण्यात आली नाही.

हरयाणामधील कैथल परिसरातील गुहल्ला या गावात १५० वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. १५० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे गावकऱ्यांनी होळी साजरी करणे बंद केले. या गावात एक साधूबाबा राहात होते. काही गावकऱ्यांनी होळीच्या दिवशी या बाबांची चेष्टा केली.

ही चेष्टा बाबांच्या इतकी जिव्हारी लागली की, साधूबाबांनी होलिकादहनावेळी होळीत उडी घेऊन आत्मदहन केले. यापुढे गावात होळी साजरी करणाऱ्या कुटुंबाचा सर्वनाश होईल, असा शापही दिला. त्या दिवसापासून या गावात होळीची परंपरा स्थगित झाली आहे. गुहल्लातील गावकरी एकमेकांनी होळीच्या शुभेच्छाही देत नाहीत.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यापासून ३५ कि.मी. दूर असलेल्या खरहरी नामक गावात सुमारे १५० वर्षांपासून होळी खेळली जात नाही. होळीच्या दिवशी हे गाव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यानंतर गावात महामारी पसरली. यात गावाचे अतोनात नुकसान झाले.

तेव्हापासून या गावात होळी खेळली जात नाही. दुसरीकडे, छत्तीसगड राज्यातील धमनागुडी या गावात २०० वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. या गावात गुलाल उधळणे आणि होलिकादहन करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. होळीच्या दिवशी एकही गावकरी आपल्या घराच्या बाहेर पडत नाही.

उत्तर प्रदेशातील कुंडरा गावात केवळ महिलांना होळी खेळण्याची परवानगी आहे. महिलांना आराम मिळावा, यासाठी होळीच्या दिवशी पुरुषमंडळी शेतावर जातात.

या गावातील राम-जानकी मंदिरात एकत्र जमून महिला होळीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. मात्र, कोणत्याही पुरुषाला किंवा लहानग्यांना होळी खेळण्यास प्रतिबंध आहे.