Holi 2025: तुमची रास कोणती? राशीनुसार रंग उधळा, सुख-सौभाग्य प्राप्त करा, भाग्यही उजळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:35 IST2025-03-11T09:15:08+5:302025-03-11T09:35:01+5:30
Holi 2025: होळीला योग्य रंगांचा वापर केल्यास ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुमची रास कोणती? कोणता रंग ठरेल लकी? जाणून घ्या...

मराठी वर्षभरात नाना प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळी साजरी केली जाते. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो.
गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. आपापसातील वैरभाव विसरून आनंद साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते.
होळी हा रंगांचा सण मानला जातो. रंगांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो. होळीला योग्य रंगांचा वापर केल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. रंगांचे स्वतःचे असे एक महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तुमच्या राशीप्रमाणे रंगांचा वापर केल्यास तुमचे भाग्य चमकू शकते. जीवनात आनंद, सुख-समृद्धी यांची वृद्धी होऊ शकते.
होळीला मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल, गुलाबी तसेच पिवळ्या रंगांचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. या दोन्ही राशीचा स्वामी मंगळ आहे.
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. होळीला वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्ती पांढरा, गुलाबी आणि करडा या रंगांचा वापर करणे लाभदायक ठरू शकते. तसेच निळा, हिरवा या रंगांनीही होळी खेळली जाऊ शकते.
मिथुन आणि कन्या या राशीचा स्वामी बुध आहे. या दोन राशीच्या व्यक्तींनी होळीला हिरव्या रंगाचा प्रयोग करणे शुभ मानले गेले आहे.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी पांढरा किंवा करडा रंग होळीला वापरणे शुभलाभदायक ठरू शकते. याशिवाय पिवळा रंगही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीला नारंगी, पिवळ्या रंगांनी होळी खेळावी, असे सांगितले जात आहे. असे केल्याने जीवनात मधुरता येऊ शकते. आनंद द्विगुणित होऊ शकतो.
धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी पिवळ्या, लाल आणि नारंगी रंगाचा वापर करणे शुभ मानले गेले आहे.
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीला निळा, वांगी रंगाचा वापर करणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
होळी म्हटली की, तरुणाईमध्ये वेगळा उत्साह संचारतो. दुसरीकडे, हिंदू धर्मातील सण-उत्सवांकडे समृद्धी, सौभाग्य, सुख-समाधान, सकारात्मकता यादृष्टीनेही पाहिले जाते. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभरात धुलिवंदनाची धूम असते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.