नखांच्या ठेवणीवरून ओळखा तुमचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:49 PM 2021-02-20T12:49:50+5:30 2021-02-20T12:53:35+5:30
सामुद्रिक शास्त्रानुसार नखाच्या आकारावरून तुमचे भवितव्य स्पष्ट होते. नखांची उंची, गोलाई, लांबी, रुंदी आणि रंग ही लक्षणे विचारात घेतली जातात. नखांवर पडलेले डाग, चिन्ह सूचक गोष्टी व्यक्तिमत्त्वाबद्दल विशिष्ट संकेत देत असतात. तसेच आपल्या आरोग्याबद्दलही सूचना देत असतात. चला तर जाणून घेऊया, नखांवरून आणखी काय काय कळू शकते. लाल गुलाबी नखे : ज्या लोकांची नखे लालसर गुलाबी असतात आणि त्यावर चकाकी असते, ते लोक अतिशय भाग्यवान असतात. नखांच्या ठराविक उंचीपेक्षा थोडी जास्त उंची भाग्याचे लक्षण मानले जाते. मात्र, काही कारणाने नखांवर काळे डाग पडले असतील, तर सावध राहा़ हे डाग येत जात राहतात. त्याबरोबर तुमच्या आरोग्यातही बदल घडत राहतात.
नखांवरील निळाई : ज्या लोकांच्या नखावर हलकीशी गोलाई असते आणि त्यावर निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे डाग असतील, तर ते डाग हृदयरोगासंबंधी सूचना देतात. अनेकांच्या नखांवर गडद निळा, जांभळा रंग असतो. हा रंग सुचवतो, की तुमच्या शरीराला प्राणवायुचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवतात. नखांवरून व्यक्तीचा स्वभावही कळतो. ज्या लोकांच्या नखांची पटापट वाढ होत असेल, ते अतिशय भावूक असतात. सरळ-साधे असतात. त्यांना वरचेवर ताप किंवा कंबरदुखीचा त्रास होत असतो.
जाड नखे : लांब, रुंद व सहसा न तुटणारी नखे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. याउलट कमी जास्त उंचीची व पटकन तुटणारी नखे रोगटपणाची तसेच निर्धनतेची लक्षणे मानली जातात. नखे अगदी पातळ असतील, तर ते आळशीपणाचे लक्षण असते. अशा लोकांना सतत काही ना काही दुखणे सुरू असते. अपुरी झोप मिळते. अशा लोकांची नखे टोकाशी लांब आणि खाली निमुळती असतात. या लोकांचा स्वभाव मनमिळावू असतात. ते कोणाशीही सहज जुळवून घेऊ शकतात.
लाल नखे : ज्यांच्या नखांचा रंग लाल असतो, ते अतिशय तापट असतात. शिघ्रकोपी असतात. तर ज्यांची नखे पिवळसर असतात, तेही अनारोग्याचे लक्षण असते. ज्यांची नखे खूपच छोटी असतात, ते बालपणापासून बुद्धीमान असतात आणि सतर्क असतात. त्यांच्यात सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता होती.