Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 11:00 IST2024-09-28T10:54:13+5:302024-09-28T11:00:13+5:30
Indira Ekadashi 2024: आज शनिवार २८ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पितरांना मोक्ष देणारी तर आहेच शिवाय आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर सारून धनप्राप्ती करून देणारी देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा आणि भगवान विष्णू तथा लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळवा!

नोकरीत बढतीचे उपाय
इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. पूजेच्या वेळी ११ विड्याच्या पानांवर कुंकवाने 'श्री' लिहून भगवान विष्णूला अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर व्हावी अशी प्रार्थना करा. या उपायाचा नोकरी व्यवसायासाठी लाभ होईल.
लक्ष्मी आणि विष्णूला खिरीचा नैवेद्य
इंदिरा एकादशीला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची पूजा, स्तोत्रपठण, श्रवण करा आणि खिरीचा नैवेद्य दाखवा. याच खिरीचा नैवेद्य पितरांनाही दाखवल्यामुळे लक्ष्मी, विष्णूंसकट पितरांचेही आशीर्वाद मिळतील! आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
कनकधारा स्तोत्राचा महिमा
इंदिरा एकादशीला व्रत कथा वाचण्याबरोबरच देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि कनकधारा स्तोत्रही म्हणा. ऐश्वर्य, सुबत्ता, धनधान्यासह लक्ष्मी कृपा देणारे हे स्तोत्र निदान पाच वेळा म्हणा.
चांदीच्या नाण्याची पूजा
सर्वांच्या देव्हाऱ्यात लक्ष्मीचे चांदीचे नाणे असते. त्या नाण्याची हळद, कुंकू, अक्षता, फुल वाहून पूजा करा. तुमच्याकडे चांदीचे नाणे नसेल तर लक्ष्मी विष्णूंच्या प्रतिमेची पूजा करा आणि कनकधारा स्तोत्र पठण करा.
धनप्राप्तीसाठी खास उपाय
इंदिरा एकादशीला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी चंदन आणि केशर मिसळून तयार केलेले गंध देवाला आणि स्वतःला लावा. तसेच गंधाचे एक बोट तुमच्या तिजोरीलादेखील लावा, त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होईल आणि धनवृद्धी देखील होईल.