कबुतर डोक्यावर शिटलं तर धनलाभाची शक्यता असते म्हणे...;नेमकं काय आहे 'लॉजिक'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:22 PM2022-07-22T18:22:53+5:302022-07-22T18:36:47+5:30

महत्त्वाच्या कामासाठी कडक इस्त्रीचे कपडे घालून निघावं आणि कबुतराने अंगा-खांद्यावर, डोक्यावर शिटायला एक गाठ पडावी, हे आजवर आपण दुर्दैवच मानत होतो, बरोबर ना. पण ज्योतिष शास्त्रात तसेच एका संशोधनात असे आढळून आले आहे, की कबुतर डोक्यावर शिटले असता अनेक फायदे होतात. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊ.

कबुतराला शांतिदूत ही उपाधी दिली आहे खरी, पण सगळ्यात जास्त उच्छाद त्याचाच असतो. त्याच्या पंखांमुळे रोगराई पसरते ती वेगळी! शिवाय दिवसभर गुटर्गु सुरू असते आणि दुपारी आपल्या झोपेची आणि त्यांची छतावर घसरगुंडी खेळायची वेळ एकच येते. त्यामुळे अनेकांना हा शांतिदूत अशांतीदूतच जास्त भासतो. पण अलीकडे एका संशोधनात म्हटले आहे, की कबुतर उपद्रवी वाटत असला तरी त्याचे शिटणे शुभ असते म्हणे! त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलात आणि कबुतर डोक्यावर शिटलं, तर त्याच्यावर रागवू नका; तो तुमच्या धनलाभाचा दिवस आहे असे समजा!

कावळ्याचे अंगावर शिटणे शुभ असते हे ऐकले होते, पण कबुतराच्या बाबतीत कळलेली ही माहिती नवीनच आहे. वास्तविक पाहता आपण कामावर जाताना असा प्रसंग घडला तर निश्चितच आपला आत्मविश्वास कमी होईल, सारे लक्ष कपड्यांकडे लागून राहील. म्हणून या छोट्याशा बाबीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून तिला शुभ ठरवून लोक मोकळे झाले असावेत. काही जण तर सांत्वन करताना म्हणतात, नशीब समजा देवाने गायी-म्हशींना पंख दिले नाहीत! विनोदाचा भाग सोडा पण पण काही जणांना त्यावरही संशोधन करावेसे वाटले म्हणजे कमाल आहे. त्यावर त्यांच्या हाती काय निष्कर्ष आला ते पाहू...

कबुतर डोक्यावर शिटल्यामुळे दिवस चांगला जातो. गोड बातमी कळते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात. आणि मुखतः पुढील तीन संकेत मिळतात. जाणून घेऊया त्याविषयी...

जर तुमच्या डोक्यावर शिटले असेल तर समजून घ्या की लवकरच तुम्हाला कुठून तरीएखाद्या अनपेक्षित मार्गाने पैसे मिळू शकतात. काही संस्कृतींमध्ये पक्ष्यांना गूढ आणि जादुई प्रतीक म्हणून ओळखले जाते. कबूतर प्रामुख्याने संदेशवाहक मानले जातात आणि त्याचे आपल्या छतावर येणे आणि आपल्यावर शीट करणे शुभ ठरू शकते.

असे मानले जाते की जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघत असाल आणि तुमच्या डोक्यात कबूतर शिटले असेल तर तुमचे काम यशस्वी होण्याचे लक्षण आहे. नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर त्यात यश मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच तुमचा आगामी काळ अधिक शुभ ठरणार आहे.

आपल्या घरात, बाल्कनीत, अंगणात कबुतराने घरटे केले तर ते शुभ लक्षण आहे. अनेक दिवसांपासून ज्या शुभ वार्तेची वाट बघत असाल तर ती शुभ घटना लवकरच आयुष्यात घडणार आहे असे समजा. कबुतराने आपल्या घरी बांधलेल्या घरट्यात अंड टाकणे हेही शुभ लक्षण ठरते.