Janmashtami 2021 : महाभारतात श्रीकृष्ण नसता तर 'या' पाच गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 05:19 PM2021-08-27T17:19:44+5:302021-08-27T17:25:01+5:30

Janmashtami 2021: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच. अशा वेळी आपल्याही जीवनाचा सूत्रधार श्रीकृष्ण असेल तर हे युद्ध आपणच जिंकणार ही खात्री बाळगायला हरकत नाही. याउलट तोच महाभारतातात सामील नसता, तर अधर्म घडला असता. यासाठी महाभारतातील कृष्णाशी संबंधित पाच कथा कायम स्मरणात ठेवा.

दुर्योधन, दुःशासन या अहंकारी कौरवांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येत असे. अशात द्रौपदीने केलेली मस्करी सहन न झाल्याने त्यांनी द्यूताचा डाव रचून पांडवांना हरवले. द्रौपदीचे वस्त्रहरण केले. पांडवांना वनवासात पाठवले नंतर युद्ध केले आणि स्वतःचाच विनाश ओढवून घेतला. कृष्णाने समजूत काढूनही दुर्योधनाने युद्ध पुकारले आणि स्वतः सकट उर्वरित कौरवांचा नाश करवून घेतला.

युद्धभूमीवर तयारी सुरु असताना कृष्णाला म्हणाली, 'माझं घरटं गेलं, माझ्या पिलांचे रक्षण कर.' कृष्णाने अर्जुनाच्या हातून धनुष्य घेत हत्तीच्या घंटेवर बाण सोडला. दोर तुटून घंटा खाली पडली. अर्जुनाला वाटले कृष्णाचा नेम चुकला. कृष्ण म्हणाला माझे काम झाले. त्यानंतर अठरा दिवस युद्ध झाले. युद्धानंतर कृष्ण आणि अर्जुन युद्धभूमीची पहाणी करायला गेले असता कृष्णाने अर्जुनाला घंटा उचलायला सांगितली. घंटा उचलताच चिमणी पिलांसह सुखरूप उडून गेली.

युद्ध सुरू होण्यापूर्वी कृष्णाची मदत मागायला अर्जुन आणि दुर्योधन दोघे पोहोचले. अर्जुन पायाशी तर दुर्योधन डोक्याशी बसला. कृष्ण झोपेतून उठताच त्याचे अर्जुनाकडे लक्ष गेले. त्याला मागायची संधी मिळाली. दुर्योधनाने भांडून पहिली संधी मागितली आणि संधीच्या रूपात कृष्णाचे सैन्य मागून घेतले. तर अर्जुनाने कृष्णालाच मागून घेतले. परिणामी कृष्णाचे मार्गदर्शन अर्जुनाला मिळाले आणि पांडवांचा विजय झाला. म्हणून कृष्णाकडे काही न मागता कृष्णालाच मागून घ्यावे.

युद्धभूमीवर विरोधी पक्षात उभी असलेली मंडळी आपलीच भावंडं, गुरु, नातेवाईक आहेत आणि त्यांना मारणे आपल्या तत्वात बसत नाही असे म्हणत अर्जुनाने शस्त्र खाली ठेवली. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचे भान आणून दिले आणि सांगितले. 'युद्ध त्यांनी पुकारले आहे, ते तुला आपले मानत असते तर त्यांनी तुझ्याविरुद्ध हातात शस्त्र घेतलीच नसती. त्यामुळे तू तुझे कर्तव्य कर, बाकी फळ काय द्यायचे ते माझ्यावर सोड!'

आपण म्हणतो की पांडवांनी युद्ध जिंकले, परंतु त्यांना जर कृष्णाची साथ मिळाली नसती तर कदाचित चित्र उलट दिसले असते. हातात एकही शस्त्र न घेता केवळ मार्गदर्शन करून कृष्णाने पांडवांना विजय मिळवून दिला. एवढेच नाही, तर रथाचे सारथ्य करण्याचे हलके कामही स्वीकारले व आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला, की कोणतेही काम छोटे नसते. तर ते निष्ठेने करावयाचे असते!