Janmashtami 2021 : इच्छापूर्तीसाठी कृष्णजन्माच्या दिवशी 'या' कृष्णछबी लावणे ठरेल लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:58 PM2021-08-25T16:58:36+5:302021-08-25T17:10:30+5:30

Janmashtami 2021: कृष्ण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला पुत्र, पिता, पती, सखा, बंधू, मित्र अशा विविध रूपात आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हवाहवासा वाटतो. म्हणून त्याचे मूर्त स्वरूप डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्राप्तीचा ध्यास घ्या असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. संतती प्राप्तीत, विवाह होण्यात, करिअरमध्ये यशस्वी होण्यात अडचणी येत असतील तर हा कृष्ण सखा तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. त्यासाठी पुढे दिलेल्या माहितीनुसार कृष्णजन्माच्या दिवशी तुमच्या मनोकामनेप्रमाणे कृष्णछबी आपल्या घरात लावा.

लग्न होताच घरच्यांकडून पाळणा कधी हलणार याची चौकशी होऊ लागते. बाळकृष्ण आपल्या अंगणात रांगत यावा असे प्रत्येक वत्सल स्त्रीला वाटते. परंतु काही शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणींमुळे पाळणा लांबत असेल तर वैद्यकीय उपचाराबरोबर कृष्णपूजेचा उपाय सुचवला जातो तसेच आपल्या बेडरूममध्ये बाळकृष्णाची तसबीर लावा असे सांगितले जाते. तुम्हीदेखील या सुखापासून वंचित असाल तर कृष्णजन्माच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटोफ्रेम आपल्या बेडरूममध्ये लावा. येत्या काळात गोड बातमी मिळेल.

लग्नाळू मुलांची रांग वाढत आहे पण वाढत्या अपेक्षांमुळे लग्न लांबत आहेत. यावर उपाय म्हणून वास्तुशास्त्राने राधाकृष्णाची प्रेममग्न झालेली छबी आपल्या बेडरूम मध्ये लावा असे सुचवले आहे. कृष्णकृपेने तुमची राधिका किंवा तुमचा कृष्ण तुम्हाला लवकरच मिळेल.

मोरपिसाचे फायदे लक्षात घेता अलीकडच्या काळात मोरांना विद्रुप करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुक्या जीवाला दुखवून निवडलेला मार्ग कधीच लाभदायक ठरणार नाही. यावर वास्तू शास्त्राने तोडगा सुचवला आहे, तो म्हणून मोरपिसाचा चित्राचा किंवा बासरीचा! मोरपिसाचे चित्र देखील तेवढेच प्रभावी ठरते. किंवा दोन बासऱ्या एका रेशीम दोरीने बांधून बेडरूममध्ये लावणे लाभदायक ठरते. या उपायाने नवरा बायकोचे नाते संबंध सुधारतात व वैवाहिक जीवन सुखी होते.

युद्धभूमीवर गर्भगळीत झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने बळ दिले आणि विजयी केले त्यानुसार आपल्याही करिअर मधील अडथळे दूर करण्यासाठी गीतेचा प्रसंग सांगणारी किंवा अर्जुनाला लढण्याचे बळ देणारी कृष्णप्रतिमा आपल्या अभ्यासाच्या खोलीत लावावी. ती प्रतिमा वेळोवेळी आपले मनोधैर्य वाढवेल आणि संयम न सोडता करिअरचा आलेख उंचावत नेईल. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांनीदेखील त्यांना याच प्रतिमेचा आदर्श ठेवायला सांगितला होता.

श्रीकृष्णाकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले, परंतु आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कधीच ढळू दिले नाही. त्याचप्रमाणे आपणही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समाधानी राहण्यासाठी योगेश्वर कृष्णाची छबी डोळ्यासमोर सतत ठेवली पाहिजे.