Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांच्या मुकुटावर कायम मोरपीस का असते? वाचा, राधेचा मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:45 PM 2021-08-27T14:45:56+5:30 2021-08-27T14:51:48+5:30
Janmashtami 2021: श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक कथा, किस्सा प्रचलित आहे. अगदी अवतारकार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपिस कायम जवळ बाळगले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांची आठवण काढली जाते. मूळात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही ईश्वरी अवतार. आपल्या भारतीय संस्कृतीची ही दोन अत्युच्च शिखरे आहेत. श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णांना पूर्णावतार मानले जाते. (why shri krishna always wears peacock feather on his crown)
श्रीकृष्णाचे नाव घेतले की, गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात, तसे श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. सर्व भारतीयांनी आदराने आणि अभिमानाने ज्यांचे नित्य स्मरण केले पाहिजे अशा या दोन महान विभूती आहेत.
प्रभू रामचंद्रांनी स्वत:च्या आचरणातून 'मर्यादापुरुषोत्तम' ही बिरुदावली सार्थ करून दाखवली; तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि वेळेप्रसंगी अन्य व्यक्तींच्या सहकार्याने कशी मात करावी, ते शिकविले. यंदा सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. तर, ३१ ऑगस्ट २०२१ रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे.
राधाकृष्णाचे प्रेम हे अगदी जगजाहीर आहे. श्रीकृष्ण व राधेच्या प्रेमाबाबत, भक्तिबाबत, श्रद्धेबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. मात्र, असे काही किस्से आहेत, जे ऐकून केवळ थक्क व्हायला होते. श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही, असे सहसा होत नाही. राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेम, भक्ती व समर्पणाचे प्रतिक आहे. राधा कृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून, आध्यात्मिक प्रेम होते, असे सांगितले जाते.
देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल, ते प्रेम म्हणजे राधा-कृष्णाचे प्रेम होय. कृष्णभक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने, आत्म्याने कृष्णरुपात एकरूप झाली होती, असे मानले जाते. राधा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक कथा, किस्सा प्रचलित आहे. अगदी अवतारकार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपिस कायम जवळ बाळगले होते. यामागील नेमके कारण काय? तो किस्सा कोणता? जाणून घ्या...
एका पौराणिक कथेनुसार, गोकुळात एक मोर निवास करत असे. तो श्रीकृष्णाचा अनन्य भक्त होता. कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळकृष्णाच्या द्वाराजवळ जाऊन जप करू लागला. तो मोर अखंडपणे कृष्ण, कृष्णचे नामस्मरण करत असे. पाहता पाहता एक वर्ष सरले, तरी कृष्ण प्रसन्न होईना. एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले.
तेथूनच जात असलेल्या एका मैनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले. मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले. एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा, असा अंदाज मैनेने बांधला. परंतु, तो कृष्णद्वारी जाऊन का रडतोय, असा प्रश्न तिला पडला. मैना मोराजवळ आणि मोराला याबाबत विचारणा केली. यावर मोर मैनेला म्हणाला की, गेले वर्षभर मी कृष्णनामाचा जप करतोय.
मात्र, कृष्णाने येऊन मला साधे पाणीही विचारले नाही. मोराचे म्हणणे ऐकून मैना म्हणाली की, आपण बरसना येथे राधाराणीकडे जाऊया. ती खूप दयाळू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्की मदत करेल. मैनेचे म्हणणे मोराला पटले. ते तडक बरसना येथे राधाराणीकडे गेले. मोराने तेथेही कृष्णनामाचा जप सुरूच ठेवला. कृष्णाचे नाव ऐकून राधा धावतच आली.
राधेने मोराला तो कुठून आला, याबाबत विचारणा केली. तेव्हा राधेच्या मायेने मोर आनंदून गेला. राधाराणीचा विजय असो, असा जयघोष त्याने केला. आतापर्यंत आपण खूप दयाळू, करुणायमी असल्याचे ऐकले होते. मात्र, आज प्रत्यक्ष पाहिले, असे मोर म्हणाला. राधाराणीने औत्सुक्येपोटी यासंदर्भात विचारणा केली. त्यावर, मी गेले वर्षभर कान्हाच्या द्वारापाशी कृष्णनामाचा जप करतोय.
मात्र, कृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिले, ना कधी मला पाणी विचारले. मोराच्या या उत्तरावर राधाराणी लगेच म्हणाली की, मोरा, माझा कृष्ण असा निर्मोही नाही. मोरा, तू पुन्हा कान्हाच्या द्वारी जाऊन जप कर. मात्र, यावेळी कृष्णनाम न घेता राधे-राधे असा जप कर, असा सल्ला राधेने कृष्णाला दिला. मोराने राधेचे ऐकले आणि पुन्हा कृष्णद्वारी आला. यावेळी त्याने राधे, राधे असा जप करण्यास सुरुवात केली. राधेचे नाव ऐकून कान्हा तडक बाहेर आला.
मोराला विचारले की, तू कुठून आला आहेस? यावर मोराने सांगितले की, माधवा गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नामस्मरण करीत आहे. मात्र, ना तू माझ्याकडे पाहिलेस, ना मला कधी साथे पाणी विचारलेस. मात्र, राधेचे नाव घेतल्यास तू अगदी धावत माझी विचारपूस करण्यासाठी आलास.
कान्हाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटले. या मोराला आपण साधे पाणीही कधी विचारले नाही, याबाबत त्याला दुःख झाले. श्रीकृष्ण म्हणाला की, मोरा मी तुला पाणीदेखील विचारले नाही, हे माझे चुकलेच. मात्र, तू राधेचे नाव घेतलेस हे तुझे सौभाग्य आहे.
जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील, तोपर्यंत माझ्या शिरावर तुझे मोरपीस धारण केलेले असेन. यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल, त्यालाही माझे शुभाशिर्वाद कायम मिळतील, असा एक किस्सा, प्रचलित कथा मोरपिस धारण करण्याबाबत सांगितली जाते.