१२ वर्षांनी गुरु-मंगल योग: ५ राशींना मंगलमय काळ, गुरुची कृपा; सुख-समृद्धी, पद-पैसा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:13 PM2024-06-27T15:13:13+5:302024-06-27T15:13:13+5:30

गुरु आणि मंगळ यांचा युती योग अनेकार्थाने विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. कोणत्या राशींना सकारात्मक ठरू शकेल? ते जाणून घ्या...

जुलै महिना सुरू होत आहे. जुलै महिन्यात नवग्रहापैकी महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. सूर्य, बुध, मंगळ, शुक्र हे ग्रह गोचर करणार आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीतून म्हणजेच मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

आताच्या घडीला वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. मंगळाचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यावर गुरु आणि मंगळ या ग्रहांचा युती योग जुळून येणार आहे. मंगळ हा साहस, पराक्रम, भूमी, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. तर गुरु हा ग्रह समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, अध्यात्म आणि ज्ञानाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोन ग्रहांचा युती योग विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो.

काहींच्या मते सुमारे १२ वर्षांनी गुरु आणि मंगळाचा योग जुळून येणार आहे. १२ जुलै रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. व्यवसाय, नोकरी, करिअर, आर्थिक आघाडीवर कोणत्या राशींना गुरु आणि मंगळ यांच्या युती योगाचा सकारात्मक परिणाम आणि प्रभाव प्राप्त होऊ शकते, ते जाणून घेऊया...

मेष: गुरु-मंगळाचा युती योग लाभदायक ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. लोकप्रियता वाढू शकेल. मान आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

वृषभ: गुरु-मंगळाचा युती योग फायदेशीर ठरू शकेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती कराल. ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबतचे नाते मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीत नफा मिळू शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. उद्योजक म्हणून यशस्वी होऊ शकाल. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे शेअर बाजारातून चांगला नफा मिळू शकेल. नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. इच्छित ठिकाणी बदली केली जाऊ शकते. सैन्य, पोलीस, गुप्तचर विभाग आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित असाल तर ही वेळ चांगली ठरू शकेल.

वृश्चिक: गुरु-मंगळ युती योगाचे शुभ परिणाम मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक तणावातून आराम मिळेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.