गुरु वक्री: ‘या’ ४ राशींना पुढील ११९ दिवस उत्तम; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीकारक काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:19 PM2022-06-20T15:19:27+5:302022-06-20T15:23:38+5:30

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे वक्री होणे महत्त्वाचे मानले गेले असून, गुरुची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरू बृहस्पती देवांचे गुरु मानले गेले आहेत. ज्ञान, विज्ञान, विद्या, सौभाग्य यांचे स्वामीत्व गुरुकडे असल्याचे सांगितले जाते. नवग्रहांपैकी महत्त्वाचा मानला गेलेला गुरु शिक्षण, पैसा, कौटुंबिक आनंद, समाधान अशा गोष्टींवर प्रभाव पाडणारा असतो, असे म्हटले जाते. (jupiter retrograde in pisces 2022)

आताच्या घडीला गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. एप्रिल २०२२ रोजी गुरुने आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश केला होता. आता २९ जुलै २०२२ रोजी गुरु याच मीन राशीत वक्री होणार आहे. तर तब्बल ११९ दिवसांनी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरु मीन राशीत मार्गी होईल. (guru vakri in meen rashi 2022)

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशीही संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुरू ग्रहाच्या वक्री प्रभावाचा सर्व राशींवर परिणाम होईल.

मात्र ४ राशीच्या व्यक्तींना गुरुच्या या वक्री चलनाचा उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री होण्याचा काळ लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा कालावधी फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच बिझनेस डीलही फायनल होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत सुधारणा देखील पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात वाहवा मिळवू शकता. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा कालावधी सकारात्मक ठरू शकतो. या आगामी कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच यावेळी तुम्हाला पदोन्नती आणि मूल्यांकन मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याचबरोबर मार्केटिंग आणि मीडिया या क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा काळ भाग्यकारक ठरू शकेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर गुरू वक्री होताच रखडलेली कामे मार्गी लागतील. तसंच आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे फायदेशीर सिद्ध होऊ शकते. दुसरीकडे ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल्स, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, ते लोक यावेळी चांगले पैसे कमवू शकतात. ध्येय आणि कार्ये पूर्ण करू शकता. तुम्हाला शत्रूंवर विजय मिळू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा कालावधी लाभदायक ठरू शकतो. नोकरीत बदलाची स्थिती राहील जी शुभ सिद्ध होईल. याशिवाय नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. जे व्यवसाय करतात, त्यांना व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल. याशिवाय नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी आगामी काळ शुभफलदायक ठरू शकेल.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, गुरुचा मीन राशीत वक्री होण्याचा तुमच्यावरील परिणाम जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.