Jyeshtha Amavasya 2024:ज्येष्ठ अमावस्येला निर्जन स्थळी जाणे टाळा; कारण जुळून येतोय विशेष योग! By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 04:21 PM 2024-07-04T16:21:28+5:30 2024-07-04T16:25:06+5:30
Jyeshtha Amavasya 2024: अमावस्या या तिथीची मनात एक अनामिक भीती बसलेली असते. काही अंशी ती भीती रास्त देखील मानली जाते. चंद्राच्या अनुपस्थितीत शीतलतेचा अभाव आणि नकारात्मक शक्तींचे प्राबल्य वाढल्याने, या तिथीला देव धर्म कार्य करणे चांगले असे मानले जाते. शिवाय कोणत्या चुका टाळायला हव्यात तेही पाहू. ५ जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. त्यानिमित्त पुढील गोष्टी जाणून घेऊ. यंदा ५ जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. या तिथीला काही नियम पाळणे सक्तीचे असते असे धर्मशास्त्र सांगते. चंद्र आणि सूर्य हे मानवी जीवनाचे दिशादर्शक मानले जातात. चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावस्या. चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजीकचा संबंध आहे. अमावस्येला तोच अनुपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याची मनोवस्थाही काही प्रमाणात अस्थिर असल्याचे जाणवते.
अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजे देवपूजा, नामस्मरण! ज्येष्ठ अमावस्येनिमित्तही असेच उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. ज्येष्ठ अमावस्येला हलहारिणी अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान दान करणे शुभ मानले जाते.
या तिथीला शंकर, विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णमा आणि अमावस्यां या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी, अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये, म्हणून विष्णूंचीही आराधना केली जाते. शिवशंकर तर स्मशानवासी! अंधाराची तसेच संकटांची आपल्याला भीती वाटू नये म्हणून शिव उपासना देखील सांगितली आहे.
यंदा ज्येष्ठ अमावस्येला शनि शश योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. वास्तविक पाहता हे दोन्ही शुभ योग आहेत. या मुहूर्तावर केलेल्या कामांना यश मिळते. तसेच शनी कृपाही प्राप्त होते. म्हणून या दिवशी तामसी भोजन करू नये.
ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि मनोभावे देवपूजा करावी. या दोन्ही गोष्टींमुळे मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित होते.
असे म्हणतात की अमावस्येला नकारात्मक शक्तींचे प्राबल्य वाढते, त्यामुळे या तिथीवर निर्जन स्थळी जाऊ नये. स्वाभाविक आहे, जिथे अंधार तिथे वाईट वृत्तीचे लोक असतात. त्यांच्यात आपला समावेश होऊ नये या दृष्टीने धर्मशास्त्राने हा नियम घालून दिला आहे.
अमावस्येला जिथे भांडणं सुरु असतील तिथून काढता पाय घेणे हितावह ठरेल. मग ती अमावस्या कोणतीही असो. हुज्जत घालत न बसता आपला मार्ग वेगळा करणे उचित ठरते. अन्यथा नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.
तसेच या तिथीवर मद्य, मांसाहाराचे सेवन न करता सात्विक भोजन करून ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे. हे सगळे भौतिक सुखाचे मार्ग असल्याने ईश्वरी सेवेत चित्त रमवायचे असेल तर या गोष्टी सोडल्या पाहिजेत असे शास्त्र सांगते.