Kalashtami: दर महिन्यात येते कालाष्टमी, 'हे' उपाय करा धनधान्याची पडणार नाही कमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:49 IST2025-02-19T11:39:19+5:302025-02-19T11:49:24+5:30
Kalashtami : कालाष्टमी ही काळभैरवाची जन्मतिथी असल्याने दर महिन्यातल्या वद्य अष्टमीला ती साजरी केली जाते. २० फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील कालाष्टमी आहे. त्यानिमित्त आपण करणार आहोत ती पूजा म्हणजे काय तर महादेवाच्या काळभैरव रूपाची पूजा! ज्यांच्या जवळपास काळभैरवाचे मंदिर नसते वा ज्यांच्या देव्हाऱ्यात काळभैरवाची प्रतिमा नसते, त्यांनी महादेवाच्या पिंडीची पूजा करावी वा शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करावा असे सांगितले जाते. त्याबरोबरच दिलेले उपाय केले असता वास्तू दोष दूर होऊन घरात अन्न धान्याची कमतरता जाणवत नाही असे म्हंटले आहे.

तुम्ही अनेक घरांमध्ये वास्तूच्या प्रवेश द्वारावर गणपती, हनुमान याबरोबरच काळभैरवाची प्रतिमा पाहिली असेल. वास्तू दोष निवारणासाठी काळभैरवाची प्रतिमा मुख्य द्वारावर लावा असे सांगितले जाते. त्याबरोबरच दर महिन्यात येणाऱ्या कालाष्टमीला कोणकोणते उपाय करावे ते जाणून घ्या.
>> वास्तुदोषापासून वास्तूचे रक्षण व्हावे म्हणून दर महिन्यात कालाष्टमीला वास्तूमध्ये शिवपूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा. शंकराला अभिषेक घाला. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा.
>> आपण घरात रोज पोळी भाजी करतो. अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार समान तुकडे करा. त्यावर गूळ किंवा साखर घाला. एक तुकडा गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरी चालेल. असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागेल. ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे, तेही पूर्ण होईल. पोळी, भाकरी हे पदार्थ आपल्यातील नकारात्मकता शोषून घेतात. म्हणून ज्योतिष शास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितला आहे. गुजराती-मारवाडी घरात केले जाणारे रोडगे, बाटी यांचे दानसुद्धा पुण्यप्रद ठरते.
>> आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कालाष्टमीला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तुमच्या घरात पैशाची आवक झपाट्याने वाढेल. पिंपळाच्या झाडाची पूजा ही वास्तू दोष निवारणासाठी सांगितली जाते.
>> वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने शिवशंकराच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.