Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये ‘हे’ ४ मोठे ग्रह राशीबदल करणार; कोणाला मिळेल सर्वाधिक शुभ-लाभ? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:15 AM2022-01-02T08:15:45+5:302022-01-02T08:20:58+5:30

Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये एकाच महिन्यात नवग्रहातील चार अत्यंत महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार असून, याचा मोठा प्रभाव प्रत्येक राशीवर पडेल. जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स...

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील असे चार ग्रह आहेत, जे खूप मोठ्या कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. सन २०२२ मध्ये हे चार महत्त्वाचे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे केवळ राशींवर नाही, तर जगावरही याचा मोठा प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.

नवग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य प्रत्येक महिन्याला राशीपरिवर्तन करत असतो. तर, बुध आणि शुक्र एका महिन्यापेक्षा कमी काळ एका राशीत विराजमान असतात. मनाचा कारक मानला गेलेला चंद्र सुमारे अडीच दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो.

मंगळ ग्रह सुमारे दोन महिने एका राशीत विराजमान असतो. तर गुरु, शनी, राहु आणि केतु हे चार असे ग्रह आहेत, जे दीर्घ कालापर्यंत एका राशीत विराजमान असतात. गुरु ग्रह सुमारे एका वर्षाने राशीपरिवर्तन करतो. तसेच राहु आणि केतु एका राशीत सुमारे दीड वर्षापर्यंत असतात.

राहु आणि केतु ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रह कधीच मार्गी चलनाने राशीबदल करत नाहीत, तर ते कायमच वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. छाया ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु एकमेकांपासून सप्तम स्थानावर असतात.

नवग्रहातील सर्वांत मंदगतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनी ग्रह एका राशीत सुमारे अडीच वर्षांपर्यंत विराजमान असतो. शनी ज्या राशीत असतो, त्याच्या आधीच्या आणि पुढच्या राशीवरील शनीचा प्रभावाला साडेसाती म्हटले जाते.

सन २०२२ मध्ये याच दीर्घ चाल असणाऱ्या चार ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. ज्योतिषीय दृष्टीने विचार केला तर या चार ग्रहांच्या राशीसंक्रमाणाचा जगावर आणि सर्व राशींवर मोठा प्रभाव पडेल. हे चार अत्यंत महत्त्वाचे ग्रह कधी राशीबदल करणार? जाणून घ्या... (Planetary Positions 2022)

नवग्रहांचा गुरु मानला जाणारा गुरु ग्रह १२ एप्रिल २०२२ रोजी शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून स्वराशीत म्हणजेच आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. सन २०२२ च्या सुरुवातीला गुरु ग्रह कुंभ राशीत विराजमान आहे. गुरु ग्रह सुमारे एक वर्ष एकाच राशीत विराजमान असतात. यानंतर सन २०२३ मध्ये गुरु ग्रह मीन राशीतून पुढे जाईल.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला जाणारा शनी ग्रह तब्बल अडीच वर्षानंतर राशीपरिवर्तन करणार आहेत. शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीतून आवडत्या आपल्याच दुसऱ्या राशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान होणार आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे धनु राशीची साडेसाती संपुष्टात येऊन मीन राशीची साडेसाती सुरू होईल.

राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह नवग्रहातील छाया ग्रह मानले जातात. तसेच हे दोन्ही ग्रह क्रूर ग्रहही मानले जातात. राहु आणि केतु ग्रह लाभ स्थानी असेल तर रंकाचा राजाही होऊ शकतो किंवा परिस्थिती विपरीतही होऊ शकते, असे सांगितले जाते. हे दोन्ही ग्रह सुमारे दीड वर्ष एका राशीत असतात.

सप्टेंबर २०२० मध्ये राहु आणि केतु अनुक्रमे वृषभ आणि वृश्चिक राशीत विराजमान झाले होते. यानंतर आता थेट १२ एप्रिल २०२२ रोजी राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह वक्री चलनाने अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत प्रवेश करतील.

राहु आणि केतु या छाया ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र, मेष, वृषभ, मकर आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा राशीबदल संमिश्र स्वरुपाचा असेल. तर मिथुन, कर्क, तूळ आणि वृश्चिक या राशीच्या व्यक्तींसाठी हे राशीपरिवर्तन शुभ ठरेल आणि उर्वरित राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य असेल.

तसेच शनी ग्रहाच्या राशीपरिवर्तनामुळे धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल. तर, मीन राशीची साडेसाती सुरू होईल. तसेच मकर राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीच्या साडेसातीचा मधल्या टप्प्याला प्रारंभ होईल. तर, शनीच्या राशीबदलानंतर तूळ आणि मिथुन राशीवरील शनीचा ढिय्या प्रभाव संपून, कर्क आणि वृश्चिक राशीवर हा प्रभाव प्रारंभ होईल.