Mahashivratri 2021: तब्बल १०१ वर्षांनी जुळून येताहेत अद्भूत शुभ योग; वाचा, महत्त्व व मान्यता By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 09:21 PM 2021-03-10T21:21:49+5:30 2021-03-10T21:30:03+5:30
माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व खास आणि विशेष असल्याचे सांगितले जात आहे. नेमके कोणते शुभ योग जुळून येत आहेत? जाणून घेऊया... (amazing and auspicious yoga on mahashivratri 2021) भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना विशेष महत्त्व आहे. मराठी वर्षात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सण-उत्सवांपैकी महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. या दिवशी तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत योग जुळून येत आहेत. नेमके काय आहेत ते? जाणून घेऊया... (amazing and auspicious yoga on mahashivratri 2021)
महाशिवरात्रीला शिवपूजन करून महादेव शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस असल्याचे सांगितले जाते. या दिवशी शिवपूजनासह महादेवांची आराधना, नामस्मरण, उपासना करणे अधिक शुभ मानले जाते.
काही ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाशिवरात्रीला तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत योग जुळून येत आहेत. यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व खास आणि विशेष असल्याचे सांगितले जात आहे.
ज्योतिषांनुसार, यंदाच्या महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्धियोग आणि धनिष्ठा नक्षत्र योग असे अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. या योगांमध्ये साजरी केली जाणारी महाशिवरात्री कल्याणकारी मानली गेली आहे. गुरुवार, ११ मार्च २०२१ रोजी त्रयोदशीयुक्त चतुर्दशी आहे.
महाशिवरात्रीला जुळून येणाऱ्या अद्भूत शुभ योगांपैकी पहिला शिवयोग हा ११ मार्च २०२१ रोजी सकाळी ०९ वाजून २३ मिनिटांपर्यंत असेल. यानंतर सिद्धियोग सुरू होईल. हा सिद्धियोग १२ मार्च २०२१ रोजी सकाळी ०८ वाजून २९ मिनिटांपर्यंत असेल. तसेच रात्री ०९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र असेल.
महाशिवरात्रीला निशीथकाल उत्तररात्रौ १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटांपर्यंत असेल. तर, १२ मार्च २०२१ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून ०४ मिनिटांपर्यंत पारण मुहूर्त असेल, असे सांगितले जात आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक काळ ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी सुरू होऊन थेट १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक आल्यामुळे उत्सवावर भीतीचे सावट नको, म्हणून दक्षिण दिशेने प्रवास शक्यतो टाळला पाहिजे. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. म्हणून त्या दिवशी दक्षिण दिशेशी निगडित खरेदी, विक्री, प्रवास टाळायला हवा, असे सांगितले जाते.
यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी साधेपणाने सण साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. काही मंदिरांमध्ये एकावेळी ठराविकच्या संख्येने भाविकांना घेता येणार आहे. यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील भीमाशंकर, परळी-वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या देवस्थांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी एकावेळी केवळ ५० भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे.