शनीदेव शुभच करतो! ‘या’ ५ राशी सर्वांत प्रिय, कृपा लाभते; साडेसातीत प्रतिकूल प्रभाव पडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:17 AM2022-11-21T10:17:28+5:302022-11-21T10:29:24+5:30

शनीदेवाच्या कृपाशिर्वादामुळे शुभच होते. साडेसातीचा प्रभाव आवडत्या राशींवर फारसा पडत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

नवग्रहापैकी महत्त्वाचा मानला गेलेला ग्रह म्हणजे न्यायाधीश शनीदेव. आताच्या घडीला शनी स्वराशीत म्हणजेच मकर राशीत मार्गी चलनाने विराजमान आहे. तर जानेवारी २०२३ मध्ये शनी आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (Shani Dev Favourite Rashi)

ऑक्टोबर महिन्यात शनी मकर राशीत मार्गी झाल्याने साडेसाती किंवा ढिय्या प्रभाव यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या धनु, मकर आणि कुंभ या राशींची साडेसाती सुरू आहे. धनु राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असून, मकर राशीचा मधला टप्पा सुरु आहे. तसेच कुंभ राशीचा पहिला टप्पा प्रारंभ झालेला आहे.

मात्र, जानेवारी २०२३ मध्ये शनी कुंभ राशीत विराजमान झाल्यावर साडेसाती चक्र बदलणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. तर, मकर राशीचा शेवटचा टप्पा सुरु होईल. शनी कुंभ राशीत असल्याने या राशीचा साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल. तसेच मीन राशीला साडेसाती सुरु होऊन पहिला टप्पा प्रारंभ होईल.

मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते. शनी ग्रहाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायाधीश मानला जातो. शनी हा दु:ख, कष्ट देणारा ग्रह मानला जातो. मात्र, शनी देव वय, तांत्रिक क्षमता, समजून घेण्याची क्षमता देणारा ग्रह आहे. घरातील लोकांमध्ये आनंद आणण्याचे कामही शनी करतात.

मकर आणि कुंभ या दोन राशींचे स्वामी शनीदेव आहेत. म्हणूनच शनिदेवाला या दोन राशी प्रिय आहेत. सूर्य आणि चंद्र वगळता इतर सर्व ग्रह दोन राशींचे स्वामी आहेत. याशिवाय दोन राशी आहेत ज्या शनिदेवाला खूप प्रिय आहेत. साडेसातीतही शनी या राशींना फारसा त्रास देत नाही.

वृषभ या शुक्राचे स्वामित्व असलेल्या राशीवर शनीदेव खूप दयाळू आहेत. शुक्राच्या राशींमध्ये शनी लाभदायक मानला जातो. अशा स्थितीत शनी गोचरात असो किंवा वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत असो, तरीही ते प्रतिकूल परिणाम देत नाही. अन्य ग्रहांची स्थिती प्रतिकूल असली तरीही शनिदेव फारसा त्रास देत नाहीत, असे म्हटले जाते.

तूळ राशीचा स्वामीही शुक्रच आहे. तूळ रासही शनीदेवाला सर्वात प्रिय आहे. तूळ राशीमध्ये शनी उच्च आहे. या राशीला साडेसातीत शनीदेव त्रास देत नाहीत, जोपर्यंत त्यांच्या कुंडलीतील इतर सर्व ग्रह अत्यंत प्रतिकूल स्थितीत येत नाहीत. तूळ राशीच्या लोकांच्या प्रगतीत शनिदेव खूप मदत करतात, असे सांगितले जाते.

धनु ही गुरुचे स्वामित्व असलेली रासही शनीदेवाला प्रिय आहे. या राशीच्या लोकांना शनिदेव फारसा त्रास देत नाहीत. शनीचा गुरुशी समान संबंध आहे. त्यामुळेच साडेसाती आणि ढिय्या प्रभाव काळात धनु राशीच्या लोकांना शनी फारसा त्रास देत नाही. या राशीच्या लोकांना शनी मान-सन्मान आणि धनही देतो, असे म्हटले जाते.

मकर राशीचा स्वामी शनी आहे. म्हणूनच ही राशी शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. शनीदेव या राशींना फारसा त्रास देत नाहीत. शनीच्या साडेसाती आणि ढिय्या प्रभावातही शनीचा प्रतिकूल प्रभाव होतोच असे नाही. मकर राशीचे लोक सहजासहजी हार मानत नाहीत, त्यामुळे त्यांना शनीदेवाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत नाही, असे सांगितले जाते.

कुंभ राशीच्या लोकांवर शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव अत्यल्प राहतो. कुंभ ही शनिदेवाची राशी आहे, म्हणजेच या राशीचा स्वामी शनिदेव आहे. कुंभ राशीच्या लोकांवर शनीदेवाची कृपा कायम राहते. शनीदेवाच्या कृपेमुळे या लोकांना पैशाशी संबंधित समस्याही येत नाहीत. कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेवाचा प्रभाव फार कमी काळ राहतो, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनी लग्न स्थानी असेल तर योग्य मानला जात नाही. लग्न स्थानी शनी असेल तर व्यक्ती पुण्यवान असेल पण कामात खूप धीमी असेल. असे लोक स्वतःमध्येच अडकून राहतात आणि त्यांच्यात मोठ्या स्तरावर विचार करण्याची क्षमता कमी असते.

ज्या व्यक्तीवर शनीचा शुभ प्रभाव असतो, ती व्यक्ती मेहनती, कर्मठ आणि न्यायी असते. शनीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळते आणि त्याच्या यशाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.