शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 08:42 AM 2024-10-30T08:42:13+5:30 2024-10-30T08:54:09+5:30
Lakshmi Pujan In Diwali 2024: शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे मानले जाते. यंदा शुक्रवारी लक्ष्मीपूजन आल्याने हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा आहे. जाणून घ्या... Lakshmi Pujan In Diwali 2024: दिवाळी सण आणि उत्सव अशा दोन्ही स्वरुपात साजरा केला जातो. धनत्रयोदशी झाल्यानंतर आता नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी होत आहे. यंदा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची अधिक व्याप्ती असून, दुसऱ्या दिवशी ०१ नोव्हेंबर रोजी अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असताना लक्ष्मीपूजन सांगितले आहे.
Laxmi Pujan 2024 Diwali 2024: लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त ०१ नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असली, तरी सायंकाळपासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल. लक्ष्मीपूजनासह दिवाळीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत.
यंदा लक्ष्मीपूजनाला शुक्रवार येणे हा योगही विशेष मानला जात आहे. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण, विशेष पूजन करणे शुभ लाभदायक, पुण्यदायक मानले गेले आहे. लक्ष्मीपूजन कालावधीत कोणत्या राशींना कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...
मेष: सुरुवातीला मनात खूप उत्साह राहील. त्या जोरावर मोठी जबाबदारी हाती घ्याल. काही लोक अनपेक्षित अडचणी उभ्या करतील. दुसऱ्याचे ऐकून तिसऱ्याबद्दल मत बनवू नका. शांतचित्ताने विचार करून कामे करत राहा. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. सबुरीने वागण्याची गरज आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृषभ: व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील. मोठे निर्णय घेतले जातील. नोकरीत सुरुवातीला नवीन कामे करावी लागतील. जास्त वेळ द्यावा लागेल. भावंडांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्या. सूर्य-चंद्र युतीमुळे कार्यक्षेत्रात आव्हाने उभी राहतील. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता बाळगली पाहिजे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.
मिथुन: केतू चंद्र युतीमुळे घरगुती वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. घराशी संबंधित प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. मुलांची काळजी घ्या. त्यांच्यासाठी वेळ द्या. चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्याल.
कर्क: धनलाभ होण्याच्या चांगला काळ आहे. महत्त्वाच्या कामात दृष्टीने सफलता मिळेल. प्रगतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. व्यवसायात थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेतली पाहिजे. भावंडांशी किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. जवळचा प्रवास होईल.
सिंह: अनेक कामे हातावेगळी झाल्यामुळे हलके हलके वाटेल. मनात प्रसन्न विचार राहतील. मोठ्या उत्साहाने लोकांच्या भेटीगाठी घ्याल. आर्थिक व्यवहार जपून करा. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. भावंडांना समजून घ्या. कुणाच्या सांगण्यावरून मोठ्या उलाढालीत पडू नका.
कन्या: संमिश्र स्वरूपाची फळे मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनात काही शंका असतील. जमिनीचे व्यवहार ऐरणीवर येतील. कागदपत्रे नीट वाचून घ्या. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. वडिलधाऱ्या मंडळींचा मान राखा. आर्थिक आवक चांगली राहील. देवाणघेवाणीचे व्यवहार जपून करा.
तूळ: शुभ फळे प्राप्त होतील. मनात कल्पक विचार राहतील. भविष्यातील योजनांकडे सकारात्मक पद्धतीने बघाल. धनलक्ष्मीची कृपा राहील. जुनी येणी वसूल होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. नोकरीत प्रगतीच्या संधी दिसून येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. अनेक उत्तम लाभ होतील.
वृश्चिक: साधकबाधक अनुभव येतील. सकारात्मक परिणाम जास्त दिसून येतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. कामे वाढतील. थोडे नियोजनपूर्वक कामे केली तर फायद्याचे ठरेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. व्यवहारात दक्षता घ्या. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. अचाट साहस करणे टाळा. कायद्याची बंधने पाळा.
धनु: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. वेळेचे नियोजन नीट करून स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढा. नशिबाची साथ बाजूने राहील. उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. पैसा खर्च करण्याकडे कल राहील.
मकर: काही अडचणी असतील. एखाद्या कामात अनपेक्षित अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. नोकरीत जबाबदारीची कामे करावी लागतील. इतरांना मदत करण्याच्या नादात घराकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. फक्त कामापुरते गोड बोलणाऱ्या लोकांना ओळखा आणि योग्य ते अंतर राखा.
कुंभ: उत्साहाने कामे कराल. सकारात्मक विचारसरणीमुळे कामे होतील. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील. त्या जास्त काळ टिकणार नाहीत. चंद्र-केतू युतीमुळे थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. कामे थोडी आरामात केली तरी हरकत नाही. जीवनसाथीची चांगली साथ राहील. संमिश्र स्वरूपाच्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील.
मीन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. दगदग वाढू शकेल. काही चांगले अनुभव येतील. मनात काळजीचे विचार राहतील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. मूल्यवान वस्तु, कागदपत्रे सांभाळा. फोनवरून बोलताना ओटीपी, पासवर्ड, अशी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.