Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला 'हा' खास उपाय करा, वर्षभर आर्थिक अडचणींपासून मुक्त राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:36 AM2024-10-24T10:36:56+5:302024-10-24T10:40:34+5:30

Laxmi Pujan 2024: दिवाळी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही साजरी केली जाते. त्यात मुख्य पूजा होते ती लक्ष्मीची. धनत्रयोदशीला तसेच लक्ष्मी पूजेला त्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी कृपा असेल तर आपल्या कामात यश मिळते, त्याचा योग्य आर्थिक मोबदला मिळतो. ज्यामुळे पैशांचा अभाव जाणवत नाही आणि सर्व संसार सुखं उपभोगता येतात. त्यासाठी लक्ष्मी उपासनेत ज्योतिष शास्त्राने सांगितलेला एक खास उपाय अवश्य करा आणि वर्षभर लाभ मिळवा.

लक्ष्मी पूजनाचा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी, गणेश तसेच कुबेर महाराजांच्या पूजेची प्रथा आहे. त्यांचे पूजन आपण करतोच, त्याला जोड द्या ज्योतिष शास्त्राने सांगितलेल्या एका उपायाची! जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी कृपा तर प्राप्त होईलच शिवाय वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. जाणून घ्या उपाय.

दिवाळीच्या दिवशी घराची सजावट करून विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाई केली जाते. या झगमगाटातच आम्रपल्लवाचे मंगल तोरण बांधायला विसरू नका. त्यामुळे लक्ष्मी आगमनाचा मार्ग मंगल कारक होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही, घरात सकारात्मक वातावरण राहील. तसेच लक्ष्मी पूजेत आपण फराळाचे ताट ठेवतो, त्याबरोबरच घरी केलेल्या स्वयंपाकाच्या ताटाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. या अगत्याने, आपुलकीने शीघ्र लक्ष्मी कृपा होते.

घराची स्वच्छता करणारी केरसुणी म्हणजेच झाडू लक्ष्मी पूजेला विकत आणतात, पूजा करतात आणि त्यालाही लक्ष्मी रूप मानतात. ही प्रथा आपण जाणतोच. त्याबरोबरच आपल्या घरात काम करणारी मावशी, ताई, तसेच परिसर स्वच्छ करणाऱ्या मावशी, काका, थोडक्यात सफाई कामगारांना यथाशक्ती आर्थिक मदत करा. जेवढे दान द्याल तेवढेच दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळेल. कारण असे कृपावंत लक्ष्मी कृपेस पात्र ठरतात. दिल्याने वाढते हे लक्षात ठेवा आणि यथाशक्ती दानधर्म करत राहा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही जाणवणार नाही. फक्त कमावलेलं धन सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कमावलेले असावे हे लक्षात ठेवा.

दिवाळीच्या दिवशी छोट्याशा वाटीत तूप, साखर, दही, मध आणि दूध एकत्र करून त्याचे पंचामृत बनवा आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. सोबतच तुपाचा दिवा लावा. पिंपळाला ११ प्रदक्षिणा घाला. कर्जबाजारी असणाऱ्या लोकांनी कर्जमुक्त होण्यासाठी ११ शुक्रवार हा उपाय करावा, असे ज्योतिष शास्त्र सांगते.

दिवाळीत आपण विविध पणत्यांचे प्रकार आणतो. लक्ष्मी पूजेच्या वेळी त्यातलीच एक मातीची पणती देवीसमोर लावावी. आपल्या अडचणी लक्ष्मी मातेला सांगून त्या निवारण करण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी. नंतर तो दिवा शक्य असल्यास वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. त्यामुळे आपल्या आयुष्यातील मुख्य अडचणी दूर होऊन लक्ष्मी कृपा प्राप्त होण्यास मदत होते.