आपलंच खरं कसं करावं, हे 'चार' राशींच्या लोकांकडून शिकावं! By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:45 PM 2021-10-01T12:45:14+5:30 2021-10-01T12:50:09+5:30
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या लोकांचे दोष आणि गुण सांगितले गेले आहेत. यानुसार, ४ राशीचे लोक खूप हट्टी असतात आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालू लागतात. 'मी म्हणेन ती पूर्व' हा त्यांचा स्वभावगुण असतो. या ४ राशीचे लोक नेहमी स्वतःला इतरांपेक्षा चांगले समजतात आणि म्हणूनच त्यांना त्यांची चूक पटत नाही किंवा आपण चुकलो हे ते कधीच स्वीकारत नाहीत. उलट ते स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी अनेक दाखले देतात, पण दोन पावले मागे येऊन नमते घेणे त्यांच्या स्वभावातच नाही! जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना ही सवय आहे ते!
वृषभ वृषभ राशीचे लोक खूप प्रामाणिक, मेहनती असतात. त्यांच्या कामात निपुण असतात, परंतु आपल्याच कामाचा डंका वाजवण्याची त्यांना फार सवय असते. ते स्वत: ला सर्वोत्तम मानतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना कोणत्या कारणावरून विरोध करते तेव्हा ते वाद घालू लागतात. समोरच्याने माघार घेईपर्यंत ते वाद घालत राहतात. या गुणामुळे त्यांचे चांगले गुण झाकोळले जाऊन दुर्गुणच लोकांच्या लक्षात राहतात.
सिंह सिंह राशीच्या लोकांना नेहमी असे वाटते की ते कोणतेही चुकीचे काम करू शकत नाहीत. यामुळे, जर कोणी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली, तर सिहांसारखे अंगावर येतात. चूक त्यांचीच का असेना, पण हे लोक शेवटपर्यंत आपली चूक मान्य करत नाहीत.अशा स्वभावाने त्यांच्या जवळची माणसं त्यांच्यापासून दुरावली जातात, परंतु त्यांना आपल्या इगोपुढे ही बाब सुद्धा गौण वाटते.
वृश्चिक वृश्चिक राशीचे लोक स्वतःला केवळ सर्वोत्तम मानत नाहीत तर अशा प्रकारे वागतात की आपण त्यांना चुकीचे सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून माफी येण्याची अपेक्षाच चुकीची ठरते. या लोकांना प्रत्येक परिस्थितीत आपणच योग्य कसे, हे सिद्ध करायला आवडते. या स्वभावामुळे त्यांच्याकडे हुशारी असूनही त्यांची प्रगती थांबते.
कुंभ कुंभ राशीचे लोक अहंकारामुळे त्यांची चूक स्वीकारत नाहीत. या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव थेट करून न देता अप्रत्यक्षपणे चूक समजावली तर ते समजून जातात हाच काय तो चांगला गुण, परंतु जाहीर माघार कधीच घेत नाहीत. मात्र यांच्याशी वाद घालायला जाऊ नये कारण त्यांच्याशी वादात कोणीच जिंकू शकत नाही.