Life Lesson: नवीन वर्षांचा पहिला महिना संपत आला, पण संकल्पाचं काय? करा 'हे' चार उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:25 AM 2024-01-30T10:25:20+5:30 2024-01-30T10:31:01+5:30
Life Lesson: नवीन वर्षात नवीन संकल्पांची यादी आपण तयार करतो, पण नव्याचे नऊ दिवस झाले की उत्साह संपतो. मग चढतो आळस. बाकीच्यांची प्रगती होत राहते आणि त्यांना पाहून आपली जळफळाट! यात दोष कुणाचा? नक्कीच आपला! एका आळसामुळे आपले खूप नुकसान होते. आळशी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोक कायम आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतात. त्यामुळे त्यांच्यापासून लोक दुरावतात आणि ते एकाकी पडतात. तसे होऊ नये म्हणून दिलेले उपाय करा. त्यासाठी आपल्या कामातील चुका आधी दुरुस्त करूया. आळस कशामुळे येतो? तर मेंदू कार्यान्वित न ठेवल्यामुळे. आपल्या मेंदूला सतत कामाचा पुरवठा करावा लागतो नाहीतर तो काम करणे बंद करतो. एकतर ध्येयवेडे लोक सतत कामात असतात नाहीतर परिस्थितीमुळे हतबल झालेले, अन्यथा कामाचा कंटाळा प्रत्येकालाच येतो. मेंदू शिथील झाला, की आळस येतो.
काम नुसते करून उपयोग नाही. मेहनत तर गाढवही करते, तसे काम उपयोगाचे नाही. ध्येयाने प्रेरित होऊन काम केले पाहिजे आणि वेळ ठरवून काम केले पाहिजे. अन्यथा कामाला गती येणार नाही. दर वेळी आवडीचे काम मिळेल असे नाही, तर जे काम मिळेल ते आवडीने केले पाहिजे.
जबाबदारी घेण्याबाबत दोन पद्धतीचे लोक असतात, एक कष्टाळू आणि दुसरे कष्ट टाळू! विनोदाचा भाग सोडा, परंतु आळशी लोकांना जबाबदारी घेण्यात अजिबात रस नसतो. ते दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतील, परंतु स्वत:कडे चांगली बौद्धिक क्षमता असूनही त्याचा योग्य वापर करणार नाहीत. ही कारणे लक्षात घ्या आणि स्वत:मध्ये पुढील बदल करा.
आयुष्यात मोठे ध्येय आणि मोठे लक्ष्य ठेवा : ध्येय नसेल, तर आयुष्यात काहीच मजा नाही. आला दिवस घालवणे हे आपले जीवनाचे लक्ष्य नसून आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मग बघा, तुम्हाला दिवसाचे चोवीस तासही कमी पडतील. सुरुवात छोट्या छोट्या ध्येयापासून करा. ते ध्येय प्राप्त केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वप्नांचे क्षितीज विस्तारेल.
ताजे आणि पौष्टिक अन्न खा : अन्न हे आपल्या शरीराचे ऊर्जास्रोत आहे. कमी किंवा अधिक अन्नसेवनामुळे शरीर सुरळीतपणे काम करत नाही. म्हणून प्रमाणात अन्नसेवन करावे आणि शक्य असल्यास ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाल्यामुळे सुस्तपणा येतो आणि आळसाला निमित्त मिळते.
कामाची यादी करा : दिवसाची सुरुवात करताना आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, त्याची यादी करा आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यामुळे अनावश्यक कामात वेळ खर्च होणार नाही.
चांगली संगत ठेवा : उत्साही, अभ्यासू लोकांच्या सहवासात राहा. तुम्हाला आळस आला, तरी असे लोक तुम्हाला कामासाठी प्रोत्साहित करत राहतील. त्यामुळे तुमची आपोआप प्रगती होईल.
हळू हळू बदल करा : कोणताही बदल एका दिवसात होत नाही, त्यासाठी प्रयत्न करा आणि टप्प्याटप्प्याने बदल करा. त्यामुळे सवयीत बदल होतील आणि तुमचा उत्साह टिकून राहील. वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात मोठा बदल घडवतात हे लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा.