Maghi Ganesh Jayanti 2021: श्रीगणेश जयंती विशेष : 'या' ठिकाणी आहे मानवी मुख असलेला जगातील एकमेव गणपती By देवेश फडके | Published: February 14, 2021 06:25 PM 2021-02-14T18:25:27+5:30 2021-02-14T18:37:13+5:30
माघ मासाच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. (Maghi Ganesh Jayanti 2021) जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते. दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जात असावे, असे सांगितले जाते. याला आदि गणेश (आद्य गणेश) किंवा नरमुख गणेश, असेही म्हटले जाते. (Ganesha Temple In India With a Human Face) माघ मासाच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. (Maghi Ganesh Jayanti 2021)
माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.
गणपती ही एक वैश्विक देवता आहे. अगदी अफगाणिस्तानपासून ते जपानपर्यंत गणपतीची प्राचीन मंदिरे असलेली पाहायला मिळतात. जगभरात प्रत्येक राष्ट्रात पोचलेल्या मराठी मंडळींनी आपल्या सोबत गणपती बाप्पाही तेथे नेला आहे. व्यासांनी सांगितलेले महाभारत गणपतीने लिहिले. सुमारे ५ हजार वर्षांपासून गणपती पूजन घरोघरी केले जाते, अशी मान्यता आहे.
हजारो वर्षे, हजारो आख्यायिका आणि कथा, जगाच्या इतक्या मोठ्या भागात, इतक्या प्रचंड प्रसारामुळे गणपतीच्या रूपामध्ये खूप वैविध्यता पाहायला मिळते. हातामध्ये मुळा घेतलेला, स्त्री रूपातील वैनायकी, स्त्रीपुरुष रूपामध्ये एकत्र असलेला जपानमधील कांगितेन, अशा विविध रूपामध्ये गणपतीच्या प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात.
जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते. दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. आदि विनायक असे या मंदिराचे नाव आहे. (Ganesha Temple In India With a Human Face)
तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जात असावे, असे सांगितले जाते. महादेव शिवशंकराने गणेशाचे मानवी शीर भंग करण्यापूर्वीचे हे गणेश रूप आहे, असे मानले जाते. म्हणूनच याला आदि गणेश (आद्य गणेश) किंवा नरमुख गणेश म्हणतात.
नरमुख गणेशाला चार हात आहेत व त्याचा चेहरा भाऊ कार्तिकस्वामी म्हणजे मुरुगन यांच्यासारखा आहे. गणपती आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसला आहे. या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत.
आद्य किंवा नरमुख गणेशाची भक्ती केल्याने कुटुंबामधील आई-वडील, नवरा-बायको, मुलेबाळे यांच्यामधील संबंध उत्तम राहून कुटुंबामध्ये सलोखा राहतो. उत्तम प्रगती होते. लहान मुले आणि विद्यार्थी यांची स्मरणशक्ती वाढते, असा येथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे.
गणपतीचे मंदिर असलेल्या भागाला तिलतर्पणपुरी असे संबोधले जाते. मात्र, यामागे एक कथा आहे. ही कथा श्रीरामचंद्रांशी निगडीत आहे. एका पौराणिक कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले होते.
श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात. हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. अनेक जण पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात.