Maha Shivratri 2023 : विशेषतः 'या' राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीची चुकवू नये पूजा, होईल कृपेचा वर्षाव! By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:45 AM 2023-02-17T11:45:05+5:30 2023-02-17T11:52:28+5:30
Maha Shivratri 2023 : देवाधिदेव महादेव हे भोळे सांब म्हणूनही ओळखले जातात. कोणाही भक्ताने निस्सिम मनाने त्यांचा धावा केला, तर ते प्रसन्न होतात असा आजवरचा त्यांचा लौकीक आहे. त्यासंदर्भात अनेक पौराणिक कथाही आपल्याला वाचायला मिळतात. म्हणूनच अनेक भाविक इच्छापूर्तीसाठी महादेवाची उपासना करतात. याबाबतीत ज्योतिषशास्त्र सांगते, की अशा आठ राशी आहेत, ज्यांच्यावर महादेवाची कृपादृष्टी असतेच. या राशींचे स्वामी वेगवेगळे असले तरी त्यांच्यावर महादेवाची कृपा चटकन होते. त्यांनी साद घालण्याचा अवकाश, ते लगेच मदतीला धावून येतात. विशेषत: या राशीच्या जातकांनी आपल्या नित्य उपासनेत महादेवाची उपासना समाविष्ट केली पाहिजे. त्या राशी पुढीलप्रमाणे-
मेष : मेष मंगळाची रास आहे. त्यांचा स्वभाव थोडा तापट असतो. त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेवाची उपासना केली पाहिजे. महाशिवरात्रीपासून रोज एखादी शंकराच्या नावाची जपमाळ सुरू करा. लाभ होईल.
वृषभ : वृषभाचा स्वामी शुक्रदेव. शुक्र हा ग्रह कलेचा उपासक आहे आणि महादेव कलेचे साधक आहेत. वृषभाच्या जातकांनी आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी एखादे शिवस्त्रोत्र मुखोद्गत करावे आणि महाशिवरात्रीपासून ते नित्य नियमितपणे म्हणावे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाला चंद्र अनुकुल आहे. चंद्र महादेवाला प्रिय आहे. त्यामुळे चंद्राची शितलता आयुष्यात मिळावी, म्हणून मिथुन राशीच्या लोकांनी रोज शिवदर्शनाने दिवसाची सुरुवात करावी आणि चांगल्या कार्यारंभी शिवाचे स्मरण करावे.
कर्क : कर्क राशीचा स्वामीदेखील चंद्र आहे. चंद्र रसिकतेचा, कलेचा कारक आहे. कर्क राशीतील जातकांनी आपल्या कलेला उभारी देण्यासाठी शिवाराधना सुरू करावी. त्यामुळे मन शांत होऊन करिअरला गती मिळेल. महाशिवरात्रीपासून ओम नम: शिवाय जप सुरु करावा.
सिंह : सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. यांचा स्वभाव तापट असून लोकांशी जुळवून घेणे या राशीच्या जातकांना जमत नाही. आपले तेच खरे करण्याच्या नादात ते अनेकांना दुखावतात. अशा वेळी शंकराप्रमाणे मितभाषी होणे आणि योग्यवेळी राग व्यक्त करण्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे व रोज ध्यान केले पाहिजे.
तूळ : तूळ राशीदेखील वृषभ राशीप्रमाणे शुक्र ग्रहाच्या अखत्यारित येते. आयुष्याचे संतुलन राखण्यासाठी शंकराची उपासना लाभदायक ठरेल. शंकराच्या नामाचा जप महाशिवरात्रीपासून सुरू करावा.
मकर : मकर रास ही शनिदेवाची रास आहे. या राशीच्या जातकांना शनिदेवाबरोबरच महादेवाची कृपा प्राप्त व्हावी व त्यांच्या विलंबित कार्याला गती मिळावी, यासाठी त्यांनी शिवदर्शन घ्यावे तसेच शिवरात्रीपासून शिवस्त्रोत्रपठण सुरू करावे.
कुंभ : मकर राशीप्रमाणे कुंभ रासदेखील शनिदेवाच्या अधिपत्याखाली येते. त्यांनीदेखील महादेवाचे नाम:स्मरण करावे आणि तांडव स्तोत्राचे नित्य पठण सुरू करावे. शंकराची उपासना अधिक फलदायी ठरावी यासाठी महाशिवरात्रीनंतर दर सोमवारी उपास सुरू करावा.