Maha Shivratri 2023: २०२३ ला कधी आहे महाशिवरात्री? जुळून येतायत ७ दुर्मिळ, अद्भूत शुभ योग; पाहा, निशीथकाल वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:33 AM2023-01-31T06:33:06+5:302023-01-31T06:33:06+5:30

Maha Shivratri 2023: यंदाच्या महाशिवरात्रीला अनेक प्रकारचे शुभ योग जुळून येत असून, या व्रताचरणामुळे विविध लाभ मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.

Maha Shivratri 2023: भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तविकपणे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

यंदाच्या वर्षी म्हणजेच सन २०२३ मध्ये महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होत आहे. तर, माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ०४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. या दिवशी अनेक प्रकारचे दुर्मिळ तसेच अद्भूत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते.

महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो. सन २०२३ मध्ये शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी उत्तररात्रौ १२ वाजून २७ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ ०१ वाजून १७ मिनिटांपर्यंत निशीथकाल असणार आहे.

महाशिवरात्रीला शनिप्रदोष असणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शनिप्रदोषामुळे भगवान शिव मनोकामना लवकर पूर्ण करतात. यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते. शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्यांनी महाशिवरात्रीचे शनिप्रदोष व्रत अवश्य करावे. यामुळे शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते.

महाशिवरात्रीला १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपासून ते १९ फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये महादेवांचे व्रत करावे. या व्रताने अपार यश प्राप्त होऊ शकते. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्य सिद्धीसाठी विशेष शुभ मानला जातो. या शुभ योगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नवीन काम सुरू केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात, असे म्हटले जाते.

यंदाच्या महाशिवरात्रीला शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. १३ फेब्रुवारीला सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे महाशिवरात्रीला पिता-पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी एकाच राशीत असतील. ज्योतिषशास्त्रात पिता-पुत्र असलेले सूर्य-शनि शत्रू ग्रह मानले जातात.

असे असूनही या राशीत ते शुभ आणि फलदायी असतील. मात्र, महाशिवरात्रीला शनी अस्तंगत असेल. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. या शुभ योगात महादेव शिवाची उपासना, व्रत आणि उपवास केल्यास शनिदोष दूर होणार मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.

महाशिवरात्रीला गुरू आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे. मीन राशीतील गुरु ग्रहामुळे हंसराज योग जुळून येत आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हो योग विशेष मानला जातो. तुम्ही करिअरबाबत जो काही निर्णय घ्याल, त्याचा फायदा होईल. नवीन नोकरीसाठीचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात, असे सांगितले जात आहे.

महाशिवरात्रीला गुरुसोबत शुक्रही मीन राशीत असेल. ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शुक्र शत्रू ग्रह मानले गेले आहेत. मात्र, मीन ही शुक्राची उच्च रास आहे. त्यामुळे मालव्य नावाचा शुभ राजयोग जुळून येत आहे. या शुभ योगात भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कामांमध्ये अडचणी येत होत्या, ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.