Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला राशीनुसार करा रुद्राभिषेक; महादेवांची होईल कृपा, नशीब उजळेल, भाग्य चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:43 PM2022-02-25T20:43:04+5:302022-02-25T20:50:46+5:30

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला महादेवांवर केलेल्या रुद्राभिषेकाने पुण्यासह शुभलाभ प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

मराठी वर्षाच्या उत्तरार्धात मकरसंक्रांतीनंतर येणारा सर्वाधिक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. महादेव शिवशंकराचे पूजन, उपासना, नामस्मरण, आराधना करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पवित्र मानल्या गेलेल्या माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. (Mahashivratri 2022)

यंदाच्या वर्षी ०१ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री आहे. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. (Rudrabhishek on Mahashivratri 2022)

महाशिवरात्रीचा पवित्र सण हिंदू धर्मीयांसाठी खूप खास असतो. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. महादेवांच्या शिवलिंगावर रुद्राभिषेकही केला जातो. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. राशीनुसार रुद्राभिषेक केल्यास विशेष पुण्यासह महादेवांची विशेष कृपा होऊ शकते, असे म्हटले जाते.

मेष राशीच्या व्यक्तींनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्रावर पांढर्‍या चंदनाने श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे. हे करण्यापूर्वी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. शिवाची मनोभावे पूजा करावी, असे सांगितले जाते.

वृषभ राशीच्या व्यक्तींनी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी दूध-दही आणि साखरेचा वापर करावा. प्रथम शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा, नंतर जल अर्पण करावे. याशिवाय पंचामृताचा अभिषेक करून तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तसेच श्वेत चंदनाने तिलक लावून शिवमंत्राचा श्रद्धेने जप करावा.

मिथुन राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी बुध आहे. त्यामुळे तुम्ही भगवान शिवाला भांग मिश्रित दुधाचा अभिषेक केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल, असे सांगितले जाते.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध, दही, गंगाजल आणि साखरेचा अभिषेक करावा. कर्क राशीच्या व्यक्तींनी सुख, समृद्धी आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा उपाय अवश्य करावा.

सिंह राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेव शिवशंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवसाधकाने शुद्ध तुपाचा अभिषेक करावा. या पूजेने त्यांच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्या लवकर दूर होतात, असे मानले जाते.

कन्या राशीच्या व्यक्तींनी शिवाला धोत्रा, शमी आणि दही यांचा अभिषेक करावा. यामुळे तुमच्या गुप्त, हितशत्रूंचा नाश होईल आणि रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होऊ शकेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींनी महादेवाला पंचामृताचा अभिषेक केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमची मुले सुशिक्षित आणि आज्ञाधारक होऊ शकतील, असे मानले जाते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर गंगेचे पाणी आणि साखर मिसळून दूध अर्पण करावे. यानंतर शिवलिंगावर लाल चंदनाचा तिलक लावावा.

धनु राशीच्या व्यक्तींनी शिवशंकराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी निरसं दूध घेऊन त्यात केशर, गूळ, हळद मिसळून अभिषेक करावा. शुभ फल मिळण्यासाठी पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा वापर करावा.

मकर राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येईल तसेच शरीरही निरोगी राहील, असे मानले जाते.

कुंभ राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला तूप, मध, साखर आणि बदामाच्या तेलाने शिवाला अभिषेक करावा. यानंतर नारळपाणी अर्पण करून निळी फुले अर्पण करा. यानंतर मोहरीच्या तेलाने तिलक लावा आणि नंतर रोळीने तिलक लावा.

मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला महादेव शिवनाथाला निरसं दूध, केशर आणि गंगाजलाने अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाला हळद आणि केसराचा लावून तिलक लावावा, असे सांगितले जाते.