महाशिवरात्री: ८ राशींना अनुकूल, धनलक्ष्मी प्रसन्न; पद-पैसा-प्रतिष्ठा, महादेव कृपेने शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 09:09 IST2025-02-25T08:54:16+5:302025-02-25T09:09:09+5:30

Mahashivratri 2025: महाशिवरात्री संपूर्ण देशात साजरी केली जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Mahashivratri 2025: २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात.

ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भूत असे योग जुळून येत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, शनि आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभ राशीत त्रिग्रही योग, राहु मीन राशीत, तसेच शुक्रही मीन राशीत आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. मंगळ मिथुन राशीत आहे. केतु कन्या राशीत आहे.

एकूणच ग्रहस्थिती पाहता मेष ते मीन या सर्व राशींवर महाशिवरात्रीचा प्रभाव कसा असेल? कोणत्या राशींना सकारात्मक, अनुकूलता लाभू शकेल? कुटुंब, नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर कसा लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

मेष: मनात उत्साह राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. समाजात मान वाढेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. घरात किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊन मन मोकळे होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. चैनीवर खर्च कराल.

वृषभ: संमिश्र स्वरूपाची फळे मिळतील. या काळात संयम बाळगण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. फार घाईघाईत कामे करू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. कामाची प्रशंसा केली जाईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक मान देतील. नोकरीत मोठी संधी मिळेल. पगारवाढ व विविध प्रकारचे लाभ होतील.

मिथुन: बेफिकीरपणे वागू नका. खाण्यापिण्याची बंधने पाळा. उन्हात फिरणे टाळा. वाहने जपून चालवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवाल. मान-सन्मान मिळेल. प्रसिद्धी मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: भलेबुरे अनुभव येतील. कामाचा ताण वाढता राहील. या काळात सावधपणे वागण्याची गरज आहे. कामे झालीच पाहिजेत, असा अट्टहास करू नका, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्यावी. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील.

सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहार, आराम यांकडे दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. त्यांकडे दुर्लक्ष करा. योजना लोकांना सांगत बसू नका. आगामी काळ दिलासा देणारा ठरू शकेल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वाहन जपून चालवा.

कन्या: संवेदनशील विषयात स्वतःला अडकवून घेणे टाळा. लोकांशी गोड बोलून कामे करून घ्यावी. मुत्सद्दीपणाने वागण्याची गरज आहे. सुरुवातीला नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. मुले प्रगती करतील. सोशल मीडियावर सावधपणे व्यक्त व्हा. संमिश्र फळे मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी. कायद्याची बंधने पाळा.

तूळ: ग्रहमानाची अनुकूलता राहील. अनेक अडचणी दूर होऊ शकतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करू नका. फसव्या योजनांपासून दूर राहा. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. अनुकूल बदल होतील. त्यातून फायदा होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामाची प्रशंसा केली जाईल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. सावधपणे वागावे.

वृश्चिक: ग्रहमानाची साथ मिळेल. मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकाल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. थोड्याच प्रयत्नात यश मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. कार्यक्षेत्रात दबदबा राहील. मात्र, कामाचा ताणही वाढेल. सर्वांना सोबत घेऊन कामे करा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी.

धनु: भेटवस्तू प्राप्त होतील. अनेक अडचणी दूर होतील. आर्थिक लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संवाद ठेवा. बढती मिळेल.

मकर: कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. संयमाने वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अनुकूल फळे मिळतील. विवाहेच्छृंसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील.

कुंभ: अनुकूल वातावरण राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. संमिश्र अनुभव येतील. कायद्याची बंधने पाळा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांपासून सावध राहा.

मीन: साधक बाधक अनुभव येण्याचा काळ आहे. तरीही अनुकूलताच जास्त राहील. प्रियजनांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. बाकीच्या लोकांच्या वादात पडू नका. आज एकमेकांशी भांडणारे उद्या एकत्र होतील. धनलाभ होईल. यश मिळेल. संमिश्र फळे मिळतील.